जालना तालुक्यातील बोरगाव येथील एका प्रगतशील शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देत, २० गुंठे जमिनीवर रानभाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कार्टुल्याचे पीक घेतले आहे. त्यातून त्यांना आठवड्याला १६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
बोरगाव येथील शेतकरी दीपक डोके यांनी कापूस, सोयाबीन पिकावर होणाऱ्या खर्चाचा विचार करून २० गुंठे शेतीत रानभाजी म्हणून ओळखले जाणाऱ्या कर्टुल्याची लागवड केली आहे. आजघडीला आठवड्यातून दोन वेळा कर्टुल्याची तोडणीतून १५ ते १६ हजार रुपयाचे उत्पन्न मिळत आहे. त्यांनी लावलेल्या कर्टुल्यास प्रतिकिलोला २०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. कटुले ही रानभाजी म्हणून ओळखली जाते.
औषधी वनस्पतीमध्ये कर्टुल्याचे महत्त्व सांगितले असले, तरी सध्याच्या घडीला ही रानभाजी दुर्मीळ होत चाली आहे. कर्टुले आरोग्यासाठी फायदेशीर असल्यामुळे बाजारामध्ये या भाजीला ग्राहकांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
आजही अनेक शेतकरी पारंपरिक शेती करण्यात धन्यता मानतात. त्यामुळे त्यांना मनासारखे उत्पन्न मिळत नाही, अशा वेळी शेतकरी शेती करण्याच्या मनस्थितीमध्ये नसतात. शेती करावी की, नाही असे एक ना अनेक प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण होतात.
मात्र, शेती हा व्यवसाय आता पारंपरिक राहिलेला नाही. शेतीमध्ये रोज नव्याने प्रयोग करावे लागतात. तेव्हाच शेतीमधून चांगले उत्पन्न हाती येते, हे प्रयोगशील शेतकरी डोके यांच्या २० गुंठ्याच्या कर्टुल्याच्या शेतीपिकातून मिळणाऱ्या उत्पन्नातून सिद्ध होत आहे.
पुढील दोन महिन्यांत या पिकातून त्यांना दोन ते अडीच लाख रुपयाचे उत्पन्न होईल, अशी अपेक्षा आहे. तरुण शेतकऱ्यांनी गट शेतीच्या माध्यमातून शेतीमध्ये नवीन प्रयोग करून शेतीमध्ये उत्पादित झालेला माल बाहेर राज्यातील मार्केटपर्यंत घेऊन गेल्यास त्यातून चांगला रोजगार मिळू शकतो, असा विश्वास अनेक प्रगतशील शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
अनेक वेळा शेतात लावलेल्या पिकांवर खर्च अधिक आणि उत्पन्न कमी होते. त्यामुळे शेती करण्यात मन रमत नाही. यंदा कापूस किवा सोयाबीन न लावता इतर पीक घेतले पाहिजे. या उद्देशाने कर्तुल्याची लागवड केली. कर्टुल्याने मात्र अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न दिल्याने समाधान वाटत आहे. - दीपक डोके, शेतकरी.