दत्तात्रय पवार
जिद्द, चिकाटी, प्रचंड मेहनत करण्याची तयारी, आत्मविश्वास, प्रामाणिकपणा हे गुण अंगी असतील शेतीव्यवसायातून देखील लाखोंचे उत्पन्न मिळता येऊ शकते. याबाबत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील करंजखेड येथील एका शेतकऱ्याचे जिवंत उदाहरण आहे.
या शेतकऱ्याने एका एकरात १२० क्विंटल अद्रकचे उत्पादन काढले असून, त्याला प्रतिक्विंटल १० हजारांचा दर मिळाला आहे. म्हणजेच त्याने एक एकरात १२ लाखांचे उत्पन्न काढून गावातून उत्पन्नाचा विक्रम नोंदविला आहे.
कौतिकराव जाधव असे या शेतकऱ्याचे नाव आहे. जाधव दरवर्षी एक ते दीड एकर अद्रकची हमखास लागवड करतात. रोहिदास व ईश्वर ही दोन मुले त्यांना शेतीव्यवसायात मदत करतात. ते पारंपरिक, आधुनिक पद्धतीने शेती करतात. मे २०२३ मध्ये त्यांनी एक एकरात ११० क्विंटल अद्रकचे उत्पादन काढले होते. त्यांनी तीस बेडवर अद्रकची ठिबकवर लागवड केली होती.
या पिकाला शेणखत, रासायनिक खते, कीटकनाशक औषधी असा एकूण दीड ते दोन लाख रुपयांचा खर्च आला होता. अकरा महिन्यांत त्यांनी एकरी १२० क्विंटल अद्रकचे उत्पादन घेतले. आतापर्यंत या गावात शेतकऱ्यांनी एकरी ११० क्विंटलपर्यंत अद्रकचे उत्पादन घेतलेले आहे. परंतु, जाधव यांनी ते उत्पन्न १२० क्विंटलपर्यंत नेऊन विक्रम नोंदविला आहे.
पतीच्या व्यवसायाला पत्नीचे पाठबळ; कष्टाने दिली यशाची उंच झेप
बेणे स्वरुपात केली आद्रकची विक्री
बेणे स्वरूपात या अद्रकची विक्री करून मी १२ लाख रुपये मिळविले आहेत. मजूर पती- पत्नीला अद्रक काढण्यासाठी प्रतिक्विंटल तीनशे रुपये दिले जातात. एक जोडपे चार ते पाच क्विंटल अद्रक काढते. त्यातून दोघांना बाराशे ते पंधराशे रुपये रोजंदारी मिळत आहे. खर्च वजा जाता एक एकरात मला दहा लाख रुपये मिळाले आहेत. - कौतिकराव जाधव, आद्रक उत्पादक, करंजखेड