- विलास शेटे
खंडाने शेतजमीन घेऊन त्यात वर्षभरात तीन एन पिके घेण्याची किमया साकोरे येथील शेतकरी गणेश रामदास वायाळ यांनी साधली आहे. दिवसभर उन्हाचा कडाका व सकाळी पडणारे दव असे प्रतिकूल वातावरण असतानाही त्यांनी नुकतेच कोथिंबिरीचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. त्यातून त्यांना ३२ हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे. साकोरे येथील शेतकरी गणेश रामदास वायाळ यांनी श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथील डावकाड नावाची शेती खंडाने घेतली आहे.
नुकतेच या शेतीचे सपाटीकरण करण्यात आले असून वायाळ वर्षभरात अनेक पिके तिथून घेतात. रस्त्यालगतच ३५ गुंठे क्षेत्र आहे. यापूर्वी तेथे त्यांनी केळी पिकाचे यशस्वी उत्पादन घेतले होते. यावर्षी सुरुवातीला स्वीट कॉर्न मका हे पीक घेण्यात आले. त्यात चांगला फायदा झाला. त्यानंतर सदर शेत जमिनीत त्यांनी कोथिंबीर पीक घेण्याचे ठरवले. त्यासाठी चांगली मशागत करण्यात आली. ट्रॅक्टरद्वारे कोथिंबीरची पेरणी करून वाफे पाडण्यात आले. ३५ गुंठे क्षेत्रात २५ किलो गावरान कोथिंबीर बियाण्याची पेरणी करण्यात आली. ऑक्टोबर महिन्यात उन्हाचा कडाका तीव्र होता.
पालेभाज्याचे यशस्वी उत्पादन
अवकाळी पावसाने यापूर्वी पालेभाज्यांचे नुकसान झाल्याने बाजारात त्यांची टंचाई आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पालेभाज्याचे यशस्वी उत्पादन घेतले त्यांना चांगला बाजारभाव मिळतोय. ज्यावेळी इतर शेतकऱ्यांना कोथिंबीर पिकाचे उत्पादन घेणे शक्य होत नव्हते. कोथिंबिरीवर टिक पडण्याची शक्यता असल्याने या मोसमात हे पीक सहसा जमत नाही. मात्र वायाळ यांनी कोथिंबीर पीक यशस्वीपणे घेऊन नफा मिळवला आहे.
मेथी, कोथिंबीर पीक घेणार
कमी कालावधीत येणारे पीक म्हणून मेथी, कोथिंबीर या दोन्ही पिकांकडे पाहिले जाते. मात्र वातावरणातील बदलामुळे या पिकांचे उत्पादन घेणे काहीसे अवघड बनले आहे. कोथिंबीर पिकासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली. विशेषता कडक उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी चांगल्या उपाययोजना केल्या. परिणामी अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन निघाले असले तरी चांगले उत्पादन निघाले आहे. इतर क्षेत्रात मेथी, कोथिंबीर पीक घेण्याचा पुन्हा प्रयत्न करणार आहे.
रोगावर केली मात
कोथिंबीर पिकाला तीव्र उन्हाळा सहन होत नाही. यामुळे मर होण्याचे प्रमाण वाढते. वायाळ यांनी त्यासाठी वेळोवेळी पिकाला पाणी दिले दर आठवड्याला कोथिंबीरला पाणी भरले जात होते. या काळात त्यांनी तीन वेळा औषध फवारणी केली. दाणेदार खताची मात्रा दोन वेळा दिली. कोथिंबीर पिकाची विशेष काळजी घेतल्यामुळे हे पीक चांगल्या स्वरूपात आले. काही ठिकाणी मर झालीही मात्र बरेचसे कोथिंबीर पीक वाचवण्यात त्यांना यश आले. मजुरांच्या साह्याने कोथिंबीर पिकाची काढणी करण्यात आली.