उदापूर : कांदा मुळा भाजी... अवधी विठाई माझी !, आमची माळीयाची जात.. शेती लावू बागायत !! या युक्तीप्रमाणे उदापूर गावचे भागवताचार्य समाजप्रबोधनकार ह.भ.प. गणेश महाराज शिंदे यांनी आपल्या वडिलोपार्जित एक एकर शेतीमध्ये अन्य फळभाजी पिकांना फाटा देत जनावरांच्या चाऱ्यासाठी मका व बेंद्रीचे (ज्वारी) पीक घेतले होते.
त्यामधील बेंद्रीचे पीक सध्या स्थितीमध्ये १५ कांड्यांचे असून, उसाएवढी जाडी व उंची तब्बल १६ फूट एवढी झाली असल्यामुळे उदापूर पंचक्रोशीतील शेतकरी हे पीक पाहण्यासाठी भेट देत आहे.
वारकरी संप्रदायाचा वसा व वारसा घेऊन शिंदे महाराज हे संपूर्ण महाराष्ट्रमध्ये समाजप्रबोधन करत आहेत, तसेच गोवर्धनाचे संवर्धन करण्यासाठी त्यांनी पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथे शेती घेऊन गोशाळा उभारली आहे.
सध्या या गोशाळेमध्ये गावठी गाई, म्हैस, गावठी बैल, वासरे अशी जनावरे असल्यामुळे त्यांना चारा मिळावा यासाठी उदापूर येथील वडिलोपार्जित शेतीमध्ये फळभाज्यांमधून उत्पन्न घेण्यापेक्षा सतत मका व बेंद्री करून मुक्या जनावरांच्या खाण्यापिण्याची सोय करत आहे.
या शेतातील बेंद्रीच्या पिकाची उंची तब्बल १६ फुटांची झाली असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये याचा कुतूहलाचा विषय बनला आहे. परिसरात पहिल्यांदाच पीकाची उंची एवढी मोठी झाल्याने पंचक्रोशीतील शेतकरीदेखील बेंद्रीचे पीक पाहण्यासाठी आवर्जून भेट देत आहेत.
गोमूत्र व शेण खतावर भर- शेतीमध्ये प्रथम सरी पाडून त्यामध्ये ट्रायल बेसिसवर मेघा स्वीट नावाच्या ज्वारीचे एक किलो बियाणे पेरले व बाकीच्या शेतीमध्ये मका पेरला.- एकच कीटकनाशक फवारणी करून नंतर कुठलीही रासायनिक फवारणी न करता गोमूत्र व शेण खतावर भर दिला.- एक एकरमध्ये साधारण पंचवीस हजार रुपये खर्च आला आहे.- जनावरांच्या चाऱ्यासाठी अनेक शेतकरी एका सरीसाठी पाच हजार रुपये किंमत मोजायला तयार आहेत.- अशा पंचवीस सरी उपलब्ध असल्यामुळे साधारण हा चारा विक्रीसाठी उपलब्ध केला तरी सव्वा लाखाचे उत्पन्न मिळेल, असे ह.भ.प. गणेश महाराज शिंदे यांनी सांगितले.
अधिक वाचा: Farmer Success Story नरवाडच्या सचिनने तीन महिन्यात बेबी कॉर्न मक्यातून काढले ८० हजारांचे उत्पन्न