मच्छिंद्र देशमुखकोतूळ : शेती कधी नफा देते तर कधी तोटा; मात्र एखाद्या शेतीमालाचे तंत्र शेतकऱ्याला प्राप्त झाले तर तो जास्त उत्पादन घेत शेतीचे 'अर्थशास्त्र' शाबूत ठेवतो.
कोतूळ येथील शेतकऱ्याने दसऱ्याला शेवंती पिकातून एकाच तोड्याचे दीड लाख रुपये घेतले. कोतूळ येथील शेतकरी सुभाष भगवंत देशमुख यांनी एक एकर क्षेत्रावर १५ मे रोजी शेवंती फुलाचे पीक लावले.
नांगरणी, शेणखत, मल्चिंग, रोपे, खते ड्रीप, असा एक लाखाचा खर्च केला. सरासरी सत्तर-ऐंशी रुपये किलो भाव मिळाला. आजपर्यंत आठ-दहा तोडे झाले.
दसऱ्यासाठी गुरुवारी (दि. १०) तोडा केला. नऊशे किलो फुले निघाली. मुंबईत व्यापाऱ्याला दोनशे पाच रुपये प्रतिकिलो दराने ठरवून दिली.
मजुरी वाहतूक आणि इतर खर्च वजा जाता दीड लाख रुपये शिल्लक राहिले. दरवर्षी असे भाव मिळतात असे नाही. मात्र हे पीक सात-आठ महिने चालते.
त्यातून एक-दोन तोड्यांना हमखास शंभर ते दोनशेदरम्यान भाव मिळतात, असे ते सांगतात. शेतात हर्षल आणि प्रशांत, पत्नी असे चार लोक काम करतात. त्यामुळे फक्त तोडणीसाठी मजूर घेतले जातात.
मी गेल्या पाच-सहा वर्षांपासून फुलशेती करतो. शेवंतीची मे महिन्यात लागवड केली तर हे पीक मार्चपर्यंत चालते. यातील तंत्र कळाले. सहा- सात महिन्यांत एक-दोन तोडे चांगल्या भावाने गेले तरी नफा मिळतो. शेवंती फुलशेती तोट्याची नाही. - सुभाष भगवंत देशमुख, शेतकरी