Join us

Success story : नागपूरच्या पदवीधर तरुणाची टरबूज शेती, अडीच एकरांत 15 टन उत्पादन 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 3:22 PM

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात प्रामुख्याने कापूस, तूर, सोयाबीन, तसेच भाजीपाला पिके घेतली जातात. मात्र, अलीकडे शेती बिनभरवशाची ...

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात प्रामुख्याने कापूस, तूर, सोयाबीन, तसेच भाजीपाला पिके घेतली जातात. मात्र, अलीकडे शेती बिनभरवशाची झाली आहे. यातच उत्पन्न वाढविण्यासाठी मोहळी येथील युवा शेतकरी आकाश टेकाडे याने नवा पर्याय निवडला आहे. त्याने अडीच एकरांत टरबुजाचे १५ टनांहून अधिक उत्पादन घेत दीड लाखाचे उत्पन्न मिळविले आहे.

आकाशकडे 8.5 एकर वडिलोपार्जित शेती आहे. यापैकी सात एकरात संत्रा लागवड केली आहे, तर उर्वरित शेतीत ते मागील सात ते आठ वर्षांपासून टरबूज शेती करतात. प्रथम दीड एकरात टरबूज लागवड केली होती. आता दोन वर्षांपासून अडीच एकर शेती ठेक्याने कसायला घेतली. मल्चिंग अंथरून अडीच एकर क्षेत्रात लागवड केली. पाण्याचे व फवारणीचे योग्य नियोजन करीत बहारदार पीक घेतले. टरबूज काढणी सुरू असून, अडीच एकरात टरबूज लागवड 15 जानेवारीला केली असून, 6 एप्रिलपर्यंत दोन तोडे झाले आहेत. 

आणखी दोन तोडे होण्याची अपेक्षा आहे. सरासरी 10 ते 12 रु. प्रति किलो दर मिळाला, असा एकूण आतापर्यंत 15  टन माल निघाला आहे व एकूण नफा 1  लाख 80 हजार रुपये झालेला आहे. पुढे 18 ते 20 टन माल निघण्याची अपेक्षा आहे. एकूण २ लाख ४० हजार उत्पन्न व खर्च 1 लाख 25 हजार आलेला असून, निव्वळ नफा 2  लाख 95 हजार रु. होण्याची अपेक्षा आहे. टरबुजाची लागवड करण्याकरिता २२ ते २४ हजार रोपट्यांची गरज भासते. याकरिता त्यांनी बाहेरून रोपे खरेदी न करता स्वतः शेतामध्ये रोपे तयार केली. यामुळे त्यांचे रोपे विकत घेण्याचा खर्च वाचला. त्यांच्या शेतात होत असलेले टरबूज ते कळमना मार्केट येथे विक्रीसाठी नेतात.

टरबुजाची शेती फुलविली

आकाशचा मोठा भाऊ सचिन हा वीज वितरण कंपनीत फुलसावंगी (पुसद) परिसरात कार्यरत होते. तेथील शेतकऱ्यांच्या शेतात टरबुजाची शेती बघून आपल्याही शेतीत आपण टरबुजाचे उत्पादन काढायला सुरुवात करावी या हेतूने त्यांनी आकाशला सांगितले. प्रथम टरबूज शेती करण्याकरिता तेथील शेतकऱ्यांकडून फोनवर माहिती जाणून घेत टरबुजाची शेती फुलविली. या कामात वडील देवराव टेकाडे हे मदत करतात. ३२ व्या वर्षी आकाशचे शिक्षण बी.ए., डी.एड., आयटीआयपर्यंत झाले आहे.

पारंपरिक पिकांसोबतच इतर फळपीक व भाजीपाला पिकांची लागवड केली तर शेतकऱ्यांना वर्षभर सतत आर्थिक उत्पन्नाचा स्रोत सुरू असतो. नैसर्गिक आपत्तीमध्येसुद्धा आर्थिक स्थैर्य लाभू शकते. याबाबत कृषी विभागाच्या योजनांचा फायदा घेता येईल.- राकेश वसू तालुका कृषी अधिकारी, कळमेश्वर

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

टॅग्स :शेतीनागपूरपाणीशेती क्षेत्र