-धनराज रामटेके
चंद्रपुर : 'चूल आणि मूल' केवळ इथपर्यंतच सीमित असलेल्या महिला आता आत्मनिर्भर होताना दिसत आहेत. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी टाकलेले पाऊल यशस्वी होताना दिसत आहे. अशातच चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur) भगवानपुर येथील महिलांनी उमेदच्या सहकार्याने मस्त्यव्यवसायात (Fish Farming) पाऊल टाकले असून वर्षाला जवळपास २ ते ३ लाखांचे उत्पन्न घेत त्या आर्थिक उन्नती साधत आहेत. .
केंद्र व राज्य पुरस्कृत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानअंतर्गत ग्रामीण भागात विविध योजना व प्रकल्प ग्रामीण कुटुंब उत्पन्न वाढ व विकासाकरिता (Umed) चालविल्या जात आहेत. जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष यांच्या विशेष साहाय्याने तालुका अभियानात व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती मूलअंतर्गत विविध उपक्रम चालू आहेत. त्यात प्रामुख्याने राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प, एकात्मिक शेती, मानव विकास प्रकल्प चालविले जात आहेत. यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे बोटेझरी व कोळसा या दोन गावांचे पुनर्वसन होऊन मूल तालुक्यातील भगवानपूर हे नवीन गाव उदयास आले.
रोजगारासाठी विविध साधने
जवळपास सहाशे लोकसंख्येची वस्ती असलेल्या गावात सुरुवातीला कुठलेही रोजगाराचे साधन नव्हते. कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी रोजगाराच्या शोधात परराज्यात भटकंती करावी लागत असे. मात्र येथील महिलांना उमेदचे बळ मिळाल्याने महिलांचे १३ बचत गट तयार केले. आणि उमेदच्या सहकार्याने गावामध्ये काही उपजीविका उपक्रम चालू केले. यामध्ये गांडूळ युनिट प्रकल्प, मत्स्य उन्नती केंद्र, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, सेंद्रिय भाजीपाला लागवड व फुलशेती असे विविध उपजीविका उपक्रम चालविल्या जात आहेत.
गावतलाव भाडे तत्त्वावर
यामध्ये प्रामुख्याने तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती मूलअंतर्गत स्थापित चिचाळा-केळझर प्रभागातील प्रेरणा ग्रामसंघाने पंचायत समितीअंतर्गत झालेल्या गावतलाव लिलावात उतरून ७५ हजार रुपये भरून गावतलाव मत्स्यव्यवसाय करण्याकरिता भाडे तत्त्वावर एक वर्षासाठी घेतले. मत्स्यव्यवसायात उतरणारे तालुक्यातील पहिले महिला समूह बनले. यामुळे गावातील १५० कुटुंबाला आर्थिक उत्पन्नाचे स्रोत प्राप्त झाले. या मत्स्यव्यवसायातून वर्षाकाठी या महिलांना २ ते ३ लाखांचे उत्पन्न होत आहे. तसेच असे विविध उपक्रम चालवून कुटुंबाचे त्या उत्पन्न वाढवीत आहेत.