नंदुरबार : सफरचंदाची (Apple Farming) शेती म्हटली की आजही निवडक भागापुरती मर्यादित असल्याचे बोलले जाते. मात्र हळूहळू अनेक भागात सफरचंद पिकवले जात आहेत. नंदुरबारच्या (Nandurbar) सातपुड्याच्या डोंगरमाथ्यावरील शेतात सफरचंद लागवडीचा प्रयोग शिक्षक शेतकऱ्याने यशस्वी केला आहे. बिजरी (ता. धडगाव) येथे ही सफरचंदाची झाडे सध्या डोलू लागली असून, त्यापासून फळही मिळाले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव (dhadgaon) तालुक्यातील मनखेडी बुद्रुक येथे जिल्हा परिषद मराठी शाळेचे शिक्षक आट्या बोद्रया पावरा यांनी आपल्या बिजरी येथील शेतात सफरचंद लागवड केली आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागात असलेल्या बिजरी परिसरातील हवामान हे सफरचंद लागवडीसाठी योग्य असल्याची माहिती त्यांना काही वर्षापूर्वी मिळाली होती. त्यांनी यूट्यूबवरून सफरचंदाच्या झाडाची लागवड कशी करावी, याची माहिती घेतली होती. यातून राजस्थानातील (Rajsthan) अलवर येथील नर्सरीतून तीन विविध प्रजातींची २० रोपे मागवली होती. डिसेंबर २०२१ मध्ये लागवड केलेल्या या झाडांना बिजरी येथील घराच्या मोकळ्या जागेत लावण्यात आले होते.
दरम्यान २० पैकी तीन रोपांची शेळ्यांनी नासधूस केल्याने १७ झाडे शिल्लक राहिली होती. यात १७ झाडांना आता सफरचंद येण्यास सुरुवात झाली आहे. एका झाडाला साधारण २० ते २५ फळे येत आहेत. आट्या पावरा यांनी केलेल्या या प्रयोगाची वार्ता जिल्हाभर पसरल्याने ही झाडे आणि त्यावर लगडलेले सफरचंद पाहण्यासाठी अनेकजण या ठिकाणी भेटी देत आहेत. यातून अनेकजण सफरचंद तोडून त्यांची चव चाखत आहेत.
सेंद्रिय घटकांचा वापर करत लागवड
शिक्षक आठ्या पावरा यांना सातपुड्याच्या माती आणि हवामानाची माहिती असल्याने केवळ सेंद्रिय घटकांच्या आधारे लागवड केलेल्या झाडांचे पोषण केले होते. यात प्रत्येक झाडासाठी १० किलो शेणखत तयार केले. यात दोन किलो शेणखत, अर्धा किलो गूळ, अर्धा किलो चना डाळ, वडाखालची माती मूठभर, प्रमाणानुसार गोमूत्र यांचा समावेश होत्ता. वेळोवेळी या खताची मात्रा त्यांनी झाडाला दिली होती. शिक्षक आट्या पावरा हे शिक्षकी पेशासोबत शेतीही करतात. पारंपरिक शेती करीत असतानाच त्यांनी अचानकच सफरचंदाची झाडे मागवून लागवड केली होती.