Join us

Vegetable Farming : भाजीपाला पिकातून साधली समृद्धी, दोन एकर शेतीतून आठ लाखांचे उत्पन्न 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 4:43 PM

Vegetable Farming : या २ एकर शेतीत वांगी, मिरची, चवळी, कारले, टमाटर अशा प्रकारच्या भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहे.

Vegetable Farming : सध्या अनेक शेतकरी पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून भाजीपाला (Vegetable Farming), फळ शेतीकडे वळू लागले आहेत. त्यामुळे काही अंशी शेतकऱ्यांना इतर पिकातून उत्पन्न मिळत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील युवा शेतकऱ्याने पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता वाट चोखाळली आणि भाजीपाल्याच्या उत्पादनातून २ एकर शेतीत तो वर्षाकाठी ८ लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहे. 

भूपेश अरुण कोरे असे या युवा शेतकऱ्याचे नाव असून तो तालुक्यातील मेंढा येथील रहिवासी आहे. भूपेशकडे एकूण १० एकर शेती आहे. तीन वर्षांपूर्वीपर्यंत या १० एकर शेतीतून तो धानाचेच उत्पादन घेत होता. मात्र धानाच्या उत्पादनातून काहीच मागे पडत नव्हते. नंतर भूपेशने २ एकर शेतीत भाजीपाल्याचे उत्पादन घेण्याचे ठरवले. त्यानुसार त्याने नियोजन केले. 

आता तो या २ एकर शेतीत वर्षभर भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहे. वांगी, मिरची, चवळी, कारले, टमाटर अशा प्रकारच्या भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहे. उन्हाळ्यात तो डांगरू या पिकाचेही उत्पादन घेतो. या पिकाच्या लागवडीतून वर्षाकाठी ७ ते ८ लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहे. भूपेशने सांगितले की, मी कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय स्वयंस्फूर्तीने हे उत्पादन घेत आहे.

भाजीपाल्यास मोठी मागणी 

भाजीपाला ही लोकांची दैनंदिन गरज आहे. त्यामुळे भाजीपाल्यास मोठी मागणी आहे. तरुणांनी इतर ठिकाणी काम करण्यापेक्षा भाजीपाल्याच्या उत्पादनाकडे वळावे. मेंढा हे गाव नागभीड तालुक्यात आहे. मात्र ब्रह्मपुरीही मेंढाजवळ आहे. त्यामुळे ब्रह्मपुरीतही भूपेशच्या उत्पादित केलेल्या भाजीपाल्यास मोठी मागणी आहे. आता परिसरात भाजीपाला लागवडीसाठी शेतकरी सारसावले आहेत. 

टॅग्स :शेती क्षेत्रभाज्याशेतीचंद्रपूर