Join us

Success Story : अहमदनगरच्या मिरचीचा ठसका थेट युरोपात; नव्वद दिवसांत २ टन उत्पादन कसं घेतलं? 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 4:33 PM

अहमदनगरच्या शेतकऱ्याने हिरव्या मिरचीचे केवळ नव्वद दिवसांत दोन टन उत्पादन निघाले आहे. 

अहमदनगर : तेच ते पीक घेण्यापेक्षा शेतात असे पीक घ्यावे की, त्यातून चांगले उत्पादन मिळेल, असे मनाशी निश्चित करून एक एकरात हिरव्या मिरचीचे पीक घेतले आहे. आता ती मिरची थेट ब्रिटनबरोबरच युरोपियन देशात निर्यात होत आहे. कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका येथील शेतकरी आनंद मालकर यांनी ही किमया साधली आहे.

आनंद मालकर यांनी शेताची पूर्व मशागत करून शेतात एका एकरात पाच ट्रॉली शेणखत टाकले. शेतात ४.२५ फुटांवर समांतर वरंबा करून त्यात तीन गोण्या निंबोळी पेंड व ३ गोण्या डीएपी खत मिसळून दिले. त्याच अंतरावर ठिबक पसरविले व त्यावर मल्चिंग पेपर टाकून दीड फूट अंतरावर शार्क वन जातीची ७,५०० रोपे याच वर्षी २८ जानेवारी रोजी रोपविली. या जातीची मिरची उंच वाढते, तसेच फांद्याही मोठ्या प्रमाणात डफळतात, त्यामुळे त्यांना आधार म्हणून बांबू व तार वापरली आहे. मागील पंधरा दिवसांपासून तोड सुरू झाली असून, केवळ नव्वद दिवसांत दोन टन उत्पादन निघाले आहे. 

अजून सहा महिने उत्पादन सुरू राहणार असून, दहा ते बारा टन उत्पादन निघण्याचा अंदाज मालकर यांनी व्यक्त केला. सदरची मिरची ही सध्या युरोपियन देशांत निर्यात होत असून, सध्या किलोला 55 ते 60 रुपये दर मिळत आहे. निर्यातक्षम मिरची बनविण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर करावा लागतो, त्यासाठी शेणखत, गोमूत्र, गूळ यापासून बनविलेली 50 लीटर स्लरी ठिबकद्वारे दोन दिवसाआड सोडावी लागते. प्रत्येक ओळीच्या सुरुवातीला व शेवटी डोंडूची लागवड केली आहे. उन्हाचा, तसेच मध्याचा अटकाव करण्यासाठी शेताच्या चौहू बाजूने शेडनेटचा वापर केला आहे. तोडणीमुळे दररोज 30 मजुरांना काम मिळत आहे.

काय म्हणाले शेतकरी? 

शेतकरी संतोष मालकर म्हणाले की, निर्यातीची मिरची निवडताना तिच्यातून लाल रंगाची, वाकडी असलेली, मिरचीचा पाला यांना बाजूला करावे लागते. वीस किलोच्या वेलीत ती पॅक करून पाठवावी लागते. तेथेही ती पुन्हा तपासली जाते, मग ती निर्यात केली जाते. तर शेतकरी आनंद मालकर म्हणाले की, मिरची लागवडीपासून आतापर्यंत जवळपास एक लाख रुपये खर्च झाला असला, तरी त्यापासून अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शाश्वती निर्माण झाली आहे. 

- दिनेश जोशी

टॅग्स :शेतीअहमदनगरमिरचीशेती क्षेत्र