Join us

Women's Day : दोन वेळा संधी हुकली, पण ‘ती’ न खचली; अखेर कृषी अधिकारी बनली! 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2024 10:24 AM

अनाेमा लाडे यांनी विविध स्पर्धा परीक्षा दिल्या. दाेन वेळा त्यांची कृषी अधिकारी बनण्याची संधी थाेडक्यात हुकली.

- प्रदीप बाेडणे

गडचिरोली : स्पर्धा परीक्षेत जिद्द, चिकाटी, सातत्य, मेहनत व हुशारी हवीच. याशिवाय सर्व गोष्टी पूर्ण करायला पडद्यामागून मार्गदर्शन, सहकार्यसुद्धा लागते. आईवडिलांचे पाठबळ व वेळाेवेळी दिलेली स्फूर्ती यामुळे धानाेरा तालुक्याच्या मांगदा येथील अनाेमा पुरुषाेत्तम लाडे यांनी राज्य शासनाच्या सहकार विभागात ‘सहकारी अधिकारी श्रेणी-२’ व जि.प.मध्ये ‘कृषी विस्तार अधिकारी’ हे पद स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्राप्त केले. सध्या त्या कृषी विस्तार अधिकारीपदी कार्यरत आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्याच्या मांगदा या लहानशा खेड्यातील अनोमा लाडे यांचे वडील वन विभागात वनपाल पदावर कार्यरत आहेत. सेवाकाळात त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी बदली झाली. यामुळे अनाेमा यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कसनसूर, मांगदा, एटापल्ली व आलापल्ली येथे मराठी माध्यमात झाले. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पुणे जिल्ह्याच्या फुलगाव येथील लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झाले. या शाळेत त्यांना तत्कालीन गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्या संकल्पनेतील शासकीय योजनेतून प्रवेश मिळाला हाेता. अनाेमा यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत गाेंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी येथील कृषी महाविद्यालयातून बीएस्सी ॲग्रीकल्चर (बिजनेस मॅनेजमेंट)ची पदवी घेतली.

पाेस्ट मास्टर पदावरही केले काम

पदवीचे शिक्षण संपताच पाेस्ट विभागाची परीक्षा देऊन देलनवाडी येथे ग्रामीण पोस्ट मास्तरची नोकरी पत्करली; परंतु या नोकरीवर समाधान न मानता स्पर्धा परीक्षा देऊन चांगली नोकरी मिळविण्याची मनात जिद्द होती. पोस्ट मास्तरची नोकरी करतानाच घरूनच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेक विभागाच्या परीक्षा दिल्या.

दाेन वेळा हुकली संधी, पण जिद्दीने केला अभ्यासअनाेमा लाडे यांनी विविध स्पर्धा परीक्षा दिल्या. दाेन वेळा त्यांची कृषी अधिकारी बनण्याची संधी थाेडक्यात हुकली. तरीही निराश न हाेता, चांगली सरकारी नोकरी मिळवणारच म्हणून मनात संकल्प केला. जिद्ध, चिकाटी आणि सातत्य कायम ठेवत शेवटी यश मिळविलेच. महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागात ‘सहकारी अधिकारी श्रे-२’ जिल्हा परिषदेमध्ये कृषी विस्तार अधिकारी पदावर निवड झाली. यापैकी त्यांनी कृषी विस्तार अधिकारी पद स्वीकारले.

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

टॅग्स :शेतीगडचिरोलीशेती क्षेत्रपरीक्षाजागतिक महिला दिनमहिला