जळगाव : गिरणा काठावरील वढधे गावातील केळी (Banana Export) आता इराणला रवाना झाला आहे. केळीला १ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला आहे. शेतकरी दीपक पाटील यांनी पाच एकर क्षेत्रात केळीचा मळा फुलविला आहे. पाच एकर क्षेत्रात नऊ हजार केळी रोपांची त्यांनी लागवड केली होती. १६ रुपयांप्रमाणे प्रतीरोप खरेदी केले होते. केळी झाडाची जवळपास २७ ची रास पडत आहे. केळी माल चांगल्या दर्जाचा असल्यामुळे एका व्यापाऱ्यामार्फत ही केळी इराणला रवाना झाली आहे.
गरिबीच्या परिस्थितीवर मात करीत दीपक पाटील यांची घरची तीन एकर शेत करत असताना चिकाटीच्या जोरावर परिसरातील शेती कसायला सुरुवात केली. जमिनी कसण्यासाठी पाटील यांच्याकडे येत गेल्या. पाटील हेही आई-वडील व तीन भावंडांसह प्रत्येक शेतात राबू लागले. त्यांनी कष्टातून तीन एकर जमिनीवरून स्वतःची एकूण १७ एकर शेती झाली आहे. स्वतःची १७ एकर जमीन व दुसऱ्याची शेती अशी ते सध्या ८० एकर शेती कसत आहेत.
आज त्यांनी २२ एकर क्षेत्रात केळी पिकाची लागवड केली असून, माल कटाईला आला आहे. त्यांच्याकडे १७ सालगडी, ३ ट्रॅक्टर व इतर शेती उपयोगी साहित्य स्वतःकडे उपलब्ध असल्याने केळीची बागायत करणे सोपे झाले आहे. त्यांच्या मेहनतीला फळ आले असून, आता तर शेतातील केळी इराणमध्ये निर्यात होत आहेत. हा माल पाटील यांनी पाचोरा येथील केळी व्यापारी नशीर बागवान यांना दिला आहे.
पिकासाठी आतापर्यंत ५ लाखांचा खर्चया केळीला प्रति क्किंटल १ हजार ७०० रुपये असा चांगला भाव मिळाला आहे. आतापर्यंत केळी पिकासाठी जवळपास पाच लाख रुपये खर्च आला आहे. दोन केळी कटाईमधून साडेसात लाखांचा केळी माल झाला आहे. १८०० केळी झाडांची कटाई झाली आहे. २० लाखांचे उत्पन्न आम्हाला अपेक्षित आहे, असे शेतकरी पाटील यांनी सांगितले.