- परिमल डोहणे
चंद्रपूर :शेती क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत असून यात वेगवगेळे प्रयोगही शेतीत केले जात आहेत. मात्र शेतकऱ्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागत असल्याने अनेकदा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. अशावेळी एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या माध्यमातून कुठेतरी पाठबळ देण्याचे काम होत.त्यावेळी शेतकऱ्याला देखील नव्यानं काम करण्याची ऊर्जा मिळते. सध्या आत्माच्या संचालकपदाची धुरा सांभाळणाऱ्या प्रीती हिरळकर यांनी देखील चंद्रपूर जिल्ह्यात बंद अवस्थेत असलेल्या शंभरावर शेतकरी उत्पादक कंपन्यांना पुनर्जीवनाचे काम केले असून याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळत आहे.
राहुरी कृषी विद्यापीठात प्रीती हिरळकर यांनी कृषी विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले. एमपीएससीद्वारे सन २०१३ ला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला सहायक प्रकल्प अधिकारी म्हणून निवड झाली. सन २०१५ला आत्माच्या प्रकल्प उपसंचालक म्हणून गडचिरोली येथे त्यांनी जबाबदारी स्वीकारली. त्यांनी राबवलेला हर्बल गार्डन हा उपक्रम संपूर्ण राज्यभरात चर्चेला आला होता. त्यानंतर एप्रिल २०२३ मध्ये आत्माच्या संचालक म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली. शेतकरी प्रगत झाला तरच देश प्रगत होऊ शकतो. ही धारणा घेऊन त्यांनी शेतकऱ्यांना प्रगत तंत्रज्ञान घेण्यासाठी प्रोत्साहन दिले.
एवढेच नव्हे तर केरळ, सिक्कीम अशा ठिकाणी शेतकऱ्यांचे दौरे नेऊन प्रगत शेती कशी करायची, याबाबतचे प्रात्यक्षिक दाखविले. येथून धडे घेऊन अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात विविध प्रकारच्या पिकांची लागवड करून प्रगत शेतकरी म्हणून नावारुपास आले आहेत. लोकांना गटाच्या माध्यमातून संघटित करून, गटांना शेतकरी उत्पादन कंपनीशी जोडून शासनाचा लाभ मिळवून देण्यासाठी त्या सदैव प्रयत्न करत असल्याने अनेक शेतकऱ्यांना लाभ होत आहे. या महोत्सवातून प्रीती हिरळकर यांनी अनेक शेतकऱ्यांना प्रगत शेतीची वाट दाखविली. ज्यातून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होत आहे.
चिया लागवडीचा अनोखा प्रयोग
प्रीती हिरळकर या गडचिरोलीला असताना अश्वगंधा, स्ट्रॉबेरी लागवडीची मुहूर्तमेढ रोवली होती. चंद्रपुरात त्यांनी सुपर फूड म्हणून ओळखले जाणारे चिया बियाणे लागवडीचा प्रयोग केला. शिवाय शेतकऱ्यांना प्रगत शेतीचे धडे मिळावे, यासाठी चंद्रपुरात त्यांनी नुकताच कृषी महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवात विविध विषयांवरील तज्ज्ञ मार्गदर्शकांना पाचारण करून शेतीविषयक आवश्यक ते धडे शेतकऱ्यांना दिले. एवढेच नाही तर अनेकांना शेतीविषयक वस्तू विकण्यासाठी स्टॉल उपलब्ध करून दिले.
शेतकऱ्यांच्या ब्रॅंडिंगसाठी प्रयत्न
शेतकरी वस्तूचे उत्पादन करतो. मात्र, ते विकण्यासाठी त्यांच्याकडे मार्केटिंग स्किल नाही. त्यामुळे प्रोसेसिंग ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग यावर माझा भर आहे. यासोबतच शेतकरी उत्पादक कंपन्यांचे बळकटीकरण करून त्यातून शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांना पुरवण्यासाठी प्रयत्न करत आहे.-प्रीती हिरळकर, संचालक, आत्मा चंद्रपूर