Join us

Farmer Success Story : मनरेगातून भात शेतीत फुलली फुलशेती, भात, तुरीपेक्षा चांगलं उत्पन्न मिळतंय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 17:33 IST

Farmer Success Story : 'मनरेगा'ची (MNRGA) साथ मिळाल्याने लाखोंचे उत्पन्न इटोली येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या पदरात पडले आहे.

- आशीष खाडे 

चंद्रपूर : कल्पकता, त्यातून निर्माण होणारी स्वप्नं अन् ती पूर्णत्वास नेण्यासाठी कष्ट करण्याची तयारी, याला 'मनरेगा'ची (MNRGA) साथ मिळाल्याने लाखोंचे उत्पन्न इटोली येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या पदरात पडले आहे. दोन एकरांत या शेतकऱ्याने जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर वार्षिक तीन लाखांचे रोख उत्पन्न मिळविले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur District) बल्लारपूर तालुक्यातील इटोली येथील प्रभाकर गडकर हे शेतकरी कृषी विभागामार्फत अभ्यास दौऱ्यासाठी बारामती येथे गेले असता, त्यांना फुलाच्या शेतीबद्दल (Flowers Farming) माहिती मिळाली. गावी येताच गडकर यांनी फुलांची शेती करण्याचा निश्चय केला. मनरेगा योजनेची ग्रामपंचायतीकडून माहिती संकलन करून त्यांनी तांत्रिक सहायक राजेश बट्टे यांचे मार्गदर्शन घेतले. 

धान पिकाला फाटा देत त्यांनी आपल्या दोन एकरांत विविध फुलांच्या प्रजातींची लागवड करून थेट विक्री सुरू केली. त्यातून त्यांना महिन्याकाठी साधारण ३० हजार रुपये शिल्लक राहत आहे. गुलाब, मोगरा, झेंडू, गार्लेडिया, लीली या फुलांतून वर्षाकाठी तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. त्या फुलांच्या शेतीतूनच गावातील महिलांना रोजगार देखील गडकर यांनी उपलब्ध करून दिला. मनरेगा योजनेतून फुलांची शेती अधिक बहरलेली असून, शेतकरी लखपती होत आहे.

फुलं कुठे विकतात ?गावापासून बाजारापेठ जवळ असल्याने बल्लारपूर, राजुरा, चंद्रपूर येथे फुले विक्रीस नेतात. लग्नसराईमध्ये फुलांचे व्यापारी शेतात येऊन फुले घेऊन जातात. त्यामुळे वेळ आणि पैशांची देखील बचत होते.

पूर्वी धान व तुरीची शेती करत असल्याने उत्पन्न ४० हजारांपर्यंत येते होते. मनरेगाच्या माध्यमातून फुलाच्या शेतीकडे वळल्याने मला नगदी तीन लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न मिळत आहे. शासनाच्या योजनेचा योग्यरीत्या लाभ घेतला व त्याला कष्टाची जोड असली की शेतकरी हा लखपती होऊ शकतो.- प्रभाकर गडकर, शेतकरी, इटोली

टॅग्स :फुलंशेती क्षेत्रशेतीचंद्रपूर