भंडारा : धान पिकाला विविध पिके पर्याय ठरत आहेत. फळबाग लागवड (Horticulture Farming) व व्यवस्थापन पहिल्या टप्प्यात खर्चिक असते. किमान वर्ष, पाच वर्षे उत्पन्न येत नाही. मात्र, यात भाजीपाल्याचे आंतरपीक घेतले तर केवळ २ महिन्याच्या अंतराने उत्पन्न हाती येते. भंडारा जिल्ह्यात फळबाग योजना कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने प्रगतीवर आहे. सरिता फुंडे यांनी ३० आर. च्या मळ्यात काश्मिरीबोर व कोहळ्याची लागवड केली आहे.
पावसाळ्यातही भंडारा जिल्ह्यात भाजीपाल्याची (Vegetable Farming) व फळबागेची शेती प्रेरणादायी ठरली आहे. पहिल्या टप्प्यात भाजीपाल्याची शेती प्रगतीला आली. तर दुसऱ्या टप्प्यात फळबागेची लागवड केली आहे. जिल्ह्यात पेरू, आंबा, चिकू, फणस, करवंद, पपई, एप्पलबोर व काश्मिरी बोरसारखी फळबाग लागवड होत आहे. पालांदूर येथे आंबा व पेरूची फळबाग लागवड झाली आहे. प्रगतशील महिला शेतकरी सरिता सुनील फुंडे यांनी फळबाग व भाजीपाल्याची शेतीची लागवड केली आहे. ४ एकर जागेत दोन्ही नियोजन सुरू आहे. सध्या ३० आर. जागेत काश्मिरी बोरच्या मळ्यात कोहळ्याची लागवड केली आहे. कोहळा फुलोरावर आहे.
फुंडे यांच्या मळ्यात एक एकरात कारल्याचे तर पाऊण एकरात चवळीचे उत्पन्न सुरू आहे तर एक एकरात वांगी जोमात आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीमुळे उत्पन्नात तूट निर्माण झाली. परंतु, गत दहा दिवसांपासून पावसाने उघडीप घेता घेता बागेतुन भाजीपाल्याच्या उत्पादनाला बऱ्यापैकी यश मिळत आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून अभ्यास घेत शेतात फळबाग व भाजीपाल्याची एकत्रित शेती करण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. याकरिता कृषी विभागाचे सुद्धा मार्गदर्शन लाभत आहे. शेतकऱ्यांना नवं काही देण्याचा माझा प्रयत्न आहे.- सरिता फुंडे, बागायतदार महिला शेतकरी