- सुरेंद्र भांडारकर
गोंदिया : नोकरीसाठी अनेकदा प्रयत्न करूनही त्यात अपयश आल्याने तरुणाने खचून न जाता आपल्या एक एकर शेतीतून उन्नतीचा मार्ग शोधला. या युवकाने केलेल्या या प्रयोगाचे आता कौतुक होत असून इतर युवक आणि शेतकऱ्यांनासुद्धा यातून प्रेरणा मिळत आहे.
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा येथील नरेश चिंटू गजभिये असे त्या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे. नरेशच्या घरची परिस्थिती बेताची. अशातच आई-वडिलांचे निधन झाले. घरी केवळ एक एकर वडिलोपार्जित शेती होती. नरेशचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले होते. त्यामुळे तो नोकरीच्या शोधात भटकत होता; पण नोकरी न मिळाल्याने त्याने खचून न जाता शेती करण्याचा निर्णय घेतला, त्याच्याकडे असलेल्या एकर शेतीत काय करता येईल यासाठी नरेशने कृषी विभागाचे मार्गदर्शन घेतले. मुंडीकोटा येथील मंडळ कृषी अधिकाऱ्यांनी नरेशला काकडीची लागवड करण्याचा सल्ला दिला. हा सल्ला नरेशला पटला. त्याने आपल्या एक एकर शेतात काकडीची लागवड केली.
दरम्यान शेतात असलेल्या विहिरीच्या मदतीने तो काकडीच्या शेतीला सिंचन करीत होता. तसेच वेळोवेळी कृषी विभागाचे मार्गदर्शन घेत होता. यात तो यशस्वी झाला. यंदा पहिल्याच वर्षी काकडीचे भरघोस उत्पादन झाले काकडी विक्री करण्यासाठी त्याला बाजारपेठेत जाण्याची गरज नसून नागपूर येथील व्यापारी शेतात येऊन दोन हजार रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे काकडी खरेदी करून घेऊन जातात. काकडीच्या शेतीतून नरेश समृद्ध झाला असून तो परिसरातील युवक आणि शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहे.
पाच ते सहा जणांना दिला रोजगार
आधी नोकरीच्या शोधात भटकंती करणाऱ्या नरेशने काकडीची शेती करून त्यातून पाच ते सहा जणांना दररोज रोजगार देत आहे. काकडीच्या वाडीची देखभाल करण्यासाठी दोन मजूर नियमित काम करीत असून चार महिला मजूर दररोज काकडी तोडण्याचे काम करतात. यामुळे त्यांनासुद्धा यातून रोजगार मिळत आहे.