- आनंद इंगोले
वर्धा : या कृषिप्रधान देशात महिला तशाही पूर्वीपासूनच शेती आणि संबधित व्यवसायामध्ये पुरुषाच्या खांद्याला खांदा लावूनच काम करीत आल्या आहे. काहींनी शेतीसोबतच जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला असून त्यात महिलांचा सहभाग मोठा आहे. या व्यवसायातून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालविण्याकरिता आजही महिला झटताना दिसत आहेत. त्यातीलच एक कर्तबगार महिला म्हणजे शीलाबाई. केवळ एका गायीपासून दुग्ध व्यवसाय सुरू केला आणि आता तो दहा गायींपर्यंत पोहोचला. या महिलेची ही झेप इतरांकरिता प्रेरणादायी अशीच आहे.
वर्धा जिल्ह्यातील सिंदी येथील शीलाबाई राजेश वंजार असे या कर्तृत्ववान महिलेचे नाव आहे. या महिलेने पतीच्या खांद्याला खांदा लावून दुग्ध व्यवसायात पाऊल टाकले आणि आता हा व्यवसाय त्या स्वत: सांभाळत आहे. एका गायीपासून सुरू झालेला यांचा हा दुग्ध व्यवसाय आता दहा गायींपर्यंत पोहोचला आहे. दुग्ध व्यवसाय आणि शेळीपालन या दोन्ही व्यवासायातून त्यांनी कुटुंबाचा गाडा हाकायला सुरुवात केली आहे. आजच्या या महागाईच्या दिवसांत दुग्ध व्यवसाय करणे कठीण झाले आहे. तरीही शीलाबाई या हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने सांभाळून उत्तमरीत्या उदरनिर्वाह करीत आहेत. या व्यवसायात इतर सुविधांचा अभाव असतानाही त्यांची अपार मेहनत आणि प्रामाणिक कष्टामुळे त्या तग धरून आहेत. त्यांच्या या व्यवसायाची इतरही लोक दखल घेत आहेत.
दूध काढण्यापासून विक्रीपर्यंत राबता
शीलाबाई सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत या व्यवसायात राबताना दिसतात. हा व्यवसायच राबणाऱ्यांचा असल्याने त्याही त्याच पद्धतीने काम करीत आहेत. गेल्या १५ वर्षांपासून दुग्ध व्यवसाय करीत असून गायीचे दूध काढण्यापासून तर गोठ्याची स्वच्छता ठेवण्यापर्यंत सर्व कामकाज करतात. उन्हाळा असो की पावसाळा सर्व दिवस सारखेच असून दूध काढून त्या डोक्यावर दुधाची कॅन घेऊन विकायलाही जातात. त्यामुळे एक महिलाही हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करू शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.
जनावरांचा चाऱ्याचा खर्च वाढतोय
महिला शेतकरी शीलाबाई वंजारी म्हणाल्या की, आमचा पूर्वीपासूनच दुग्ध व्यवसाय असून यातील अडीअडचणी आम्हाला ठाऊक आहेत. शासनानेही आता दुधाचे दर कमी केल्याने त्याची झळ आम्हाला बसत आहे. जनावरांच्या वैरणाचा खर्चही दिवसेेंदिवस वाढत आहे. पण, आता या व्यवसायाशिवाय पर्याय नसल्याने आम्ही आमचे जीव की प्राण असलेली जनावरेही विकू शकत नाही. त्यामुळे अखरेच्या श्वासापर्यंत हा व्यवसाय कायम असणार आहे.