धुळे : बदलत्या काळात अनेकजण पारंपरिक शेतीला फाटा देत, शेतीत नवनवीन प्रयोग करू लागले आहेत. यात अनेक शेतकऱ्यांना यश आले आहे. धुळे जिल्ह्यातील बळसाणे येथील पोलिस पाटील आनंद हालोरे यांनीही आपल्या अडीच एकर क्षेत्रांत शेवग्याची लागवड करून त्यातून तब्बल तीन लाखांचे उत्पन्न मिळविले आहे.
माळमाथा परिसरातील बळसाणे येथील आनंदा हालोरे यांनी कृषी क्षेत्राचा अभ्यास करून अडीच एकर क्षेत्रांत मे २०२३ मध्ये १४ फूट बाय ८ फूट अंतरावर खड्डे खोदून त्यात शेवग्याच्या १३०० रोपांची लागवड केली. या रोपांना आवश्यक ते खते दिली, वेळोवेळी पाणी दिले. त्यामुळे अवघ्या सात-आठ महिन्यांतच या झाडांना शेवग्याच्या हिरव्यागार शेंगा लागल्या. या शेवग्याच्या झाडापासून हालोरे यांना शेंगांचे उत्पन्न मिळू लागले आहे. लागवडीपासून ते उत्पन्न निघेपर्यंत त्यांना जवळपास सव्वा लाखाचा खर्च लागला. मात्र, या १३०० झाडांच्या शेंगांमधून त्यांना जवळपास ३ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
गेल्या काही वर्षांपूर्वी माळमाथा परिसर शेतीसाठी समृद्ध समजला जात होता. मात्र, निसर्गाच्या अवकृपेमुळे व घटत्या पर्जन्यमानामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. असे असले तरी काही शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देऊन नवनवीन प्रयोग राबवित आहेत. कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेताना दिसून येत आहेत. असाच काहीसा प्रयोग हालोरे यांनी करत यशस्वी करून दाखविला आहे. त्यांच्या माध्यमातून इतरही शेतकऱ्यांनी शेवगा शेतीची इच्छा बोलून दाखवली आहे.
कृषी सल्लाही मोलाचा
शेतीत पारंपरिक पिके घेतली जात होती, मात्र निश्चित असे उत्पादन मिळत नव्हते, शिवाय उत्पादन आले तरी भाव मिळत नसे. म्हणून शेवगा लागवड करण्याचा प्रयत्न केला. शेवगा पिकाची लागवडीची योग्य माहिती घेऊन कृषी सल्ल्याचा माध्यमातून शेवगा शेती बहरली आहे. या शेवग्याच्या शेंगांना धुळे, जळगाव, मालेगाव येथील बाजारपेठेत मोठी मागणी आहे. सध्या शेवग्याच्या शेंगांना २० ते २५ रुपये किलोप्रमाणे भाव मिळत असल्याचे शेतकरी आनंदा हालोरे यांनी सांगितले.