Join us

Tarbuj Sheti : 65 दिवसांत चार एकरातील टरबूजातून पावणे आठ लाखांचे उत्पन्न कसे मिळवले? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 20:35 IST

Tarbuj Sheti : उत्तमराव देसले यांनी ४ एकर क्षेत्रावर टरबूज पीक (Watermelon Farming) घेत यंदा चांगला नफा कमवला आहे.

- विद्यानंद पाटील 

धुळे :शेतीला नियोजन आणि आधुनिकतेची जोड दिल्यास चमत्कार घडू शकतो, अशी उदाहरणे आजवर अनेकवेळा दिसून आली आहेत. असे एक उदाहरण सध्या कासारे येथे देखील दिसून येते. कासारे येथील प्रयोगशील शेतकरी उत्तमराव देसले यांनी चार एकर क्षेत्रात ६५ दिवसांत तब्बल ७ लाख ७५ हजारांचे टरबुजाचे उत्पन्न (Tarbuj Farming) मिळवण्याची किमया साधली आहे. 

देसले यांच्या शेतातील टरबूज थेट दिल्लीच्या व्यापाऱ्यांनी खरेदी केल्याने ते दिल्लीला निघाल्याचे दिसून येते. उत्तमराव देसले यांनी ४ एकर क्षेत्रावर टरबूज पीक (Watermelon Farming) घेत यंदा चांगला नफा कमवला आहे. वेगळे पीक घेण्याचा त्यांचा प्रयत्न चांगलाच यशस्वी झाला आहे. दरवर्षी कापूस, मका पिकांसह इतर लागवड देसले करतात. परंतु, कपाशी पिकात त्यांना अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने टरबूज शेती (Tarbuj sheti) करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वीही त्यांनी शेतात टरबूज, पपईची लागवड केली होती. 

अन् मिळाले उत्पादन..टरबूज पीक ६५ दिवसांचे झाल्याने वेलांना चार ते सहा किलो वजनाची फळे लागली आहेत. व्यापाऱ्यांमार्फत सध्या नऊ रुपये किलो दराने तोडणी करण्यात आली आहे. दिल्ली, राजस्थान यासह इतर राज्यांत उन्हाळ्यामध्ये प्रचंड तापमान असते. त्यामुळे त्या परिसरामध्ये टरबुजाची मागणी मोठ्या प्रमाणात असते. त्यात पहिल्या तोडणीला ६० टन टरबूज निघाले. चारशे रुपये टनप्रमाणे तोडणी गाडी भरण्यासाठी खर्च आला. शिवाय आणखी २० ते २५ टन टरबूज निघण्याची शक्यता आहे.

यावर्षी टरबूजचे उत्पन्न चांगल्याप्रकारे निघाल्यामुळे शेतीचा झालेला खर्च वगळता उत्पन्न चांगले आले. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत नव्याने प्रयोग करावेत.- उत्तमराव देसले, शेतकरी, कासारे

टॅग्स :शेतकरी यशोगाथाशेती क्षेत्रशेतीफळे