- गोपाल लाजूरकर
गडचिरोली : गावात रोजगार नाही म्हणून गडचिरोली (Gadchiroli) शहरात सुरुवातीला दुकानदार, व्यावसायिकांना झेंडूच्या फुलांचे हार विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला. यातूनच या व्यवसायातील क्लृप्या कळल्या. त्यानंतर गडचिरोलीतच भाड्याने खोली करून तेथे राहून हार तयार करून त्यांची विक्री करण्यास सुरुवात केली. हा व्यवसाय तेजीत आल्यानंतर दोन-तीन वर्षांतच गडचिरोली-बोरमाळा नदीघाटाकडे जाणाऱ्या रस्त्यालगतची दीड एकर शेती केवळ कसण्यासाठी घेतली. या शेतात झेंडूच्या (Zendu Farming) विविध वाणांची लागवड करून उत्पादन घेत फुले व हार विक्रीचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाने 'त्याचा' संसार सावरला.
गडचिरोली तालुका मुख्यालयापासून २० किमी अंतरावर असलेल्या अमिर्झा येथील कृष्णा श्यामराव बनकर या युवकाने झेंडू फुलाची शेती व हार विक्री व्यवसायातून रोजगार शोधला. आता याच व्यवसायाने कृष्णाचा संसार सावरला असून तो याच व्यवसायावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. कृष्णाकडे अमिर्झा येथे वडिलोपार्जित शेती आहे. या शेतीत तो धानाचे उत्पादन घेतो. काही वर्षांपूर्वी त्याने भाजीपाला लागवडीचासुद्धा प्रयोग केला होता; परंतु त्याचा हा प्रयोग यशस्वी झाला नाही.
केवळ धानाच्या शेतीवर अवलंबून न राहता त्याने गडचिरोली येथील लहान दुकानदार व व्यावसायिकांना सकाळच्या पूजेसाठी लागणाऱ्या हारांचा पुरवठा करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्याला कमी ग्राहक मिळाले. त्यानंतर वाढ झाली. ग्राहकांची संख्या वाढल्यानंतर कृष्णाने गडचिरोली येथे भाड्याने खोली करून हार विक्रीचा व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय वाढल्यानंतर अॅड. लोडल्लीवार यांच्या मालकीची वैनगंगा नदीघाटाकडे जाणाऱ्या रस्त्यालगतची दीड एकर शेती केवळ फुलशेती कसण्यासाठी घेतली. या शेतीची देखभाल कृष्णा करीत आहे. मागील तीन वर्षांपासून येथे विविध प्रकारची फुले कृष्णा हा लागवड करीत आहे.
पुण्यावरून मागविले बीज
कृष्णा बनकर यांनी पुणे येथून झेंडूचे गेलार्डिया वाण मागविले. सदर वाणाच्या बियांची लागवड केली. हे वाण हायब्रिड असल्याने मोठ्या प्रमाणात उत्पादन देते. एकेका झाडापासून जवळपास १ किलो फुलांचे उत्पादन मिळत असल्याचे बनकर यांनी सांगितले. जवळपास १०० वर ग्राहक असून घरपोच सेवा दिली जाते.
घरपोच सेवा
गडचिरोली शहरातील जवळपास १०० लहान दुकाने, मोठ्या व्यावसायिकांच्या प्रतिष्ठानांमध्ये दररोज हारांची विक्री करतो. एक हार १५ ते ५० रुपयांपर्यंत विक्री करतो. ही सेवा तो घरपोच देतो. स्वतः उत्पादित केलेल्या फुलांपासून हार तयार केले जात असल्याने त्याला महिन्याकाठी २० ते २५ हजार रुपयांचे उत्पादन प्राप्त होते.