गडचिराेली : एक रुपयाला एका राेपट्याची (Seed) विक्री करून काेणी लाखाे रुपये कमावू शकताे काय? असा प्रश्न उपस्थित केल्यास त्याचे उत्तर नाहीच असे येईल. मात्र देसाईगंज तालुक्यातील सांगवी येथील महेश माेतीराम दिवटे हा तरुण शेतकरी भाजीपाल्याची राेपे विकून लाखाे रुपये कमावत आहे. स्वत:च्या शेतात ग्रीन नेट शेड उभारून स्वत:सह कुटुंबालाही बारमाही राेजगार उपलब्ध करून दिला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील (Gadchiroli) देसाईगंज तालुक्यातील अनेक शेतकरी भाजीपाल्याची लागवड करतात. लागवड करण्यापूर्वी राेपे (Seedlings) तयार करावी लागतात. कडक ऊन, जाेराचा पाऊस यामुळे काेवळी राेपे उघड्या वातावरणात तग धरत नाही. काही कालावधीतच मरण पावतात. खरेदी करताे म्हटले तर शाेध घेऊनही राेपे मिळत नाही. परिणामी शेतकऱ्याला शेत पडीक ठेवावे लागते. ही बाब महेश यांच्या लक्षात आली. यातून भाजीपाल्याच्या राेपांची वाटिका तयार करण्याची संकल्पना सुचली. राेपवाटिका कशी तयार करावी, याची माहिती यु-ट्यबवर (Youtube) मिळवली.
पहिल्या वर्षी प्रायाेगिक तत्वावर स्वत:च्या घराच्या स्लॅबरवर राेपवाटिका तयार केली. पहिल्याच वर्षी सर्व राेपे शेतकऱ्यांनी खरेदी केली. यातून त्यांना नफाही मिळाला. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. दुसऱ्या वर्षी त्यांनी स्वत:च्या शेतात राेपेलावडीचा प्राेजेक्ट उभारला. यावर्षी त्यांचा चौथे वर्ष असून सुमारे पाच लाख राेपांची टप्प्याटप्प्याने लागवड करण्याचे नियाेजन केले आहे. जिल्ह्यत अशा प्रकारची पहिलीच राेपवाटिका असावी. त्यांच्या या नावीन्यपूर्ण प्रयाेगाचे काैतुक हाेत आहे.
अशी आहे राेपवाटिका
महेश यांनी स्वत:च्या शेतात एक हजार चाैरस मीटर क्षेत्रावर राेपवाटिका तयार केली आहे. लाेखंडी खांब उभारून त्यावर ग्रीन नेट टाकली आहे. बाजूचे किडे येऊ नये यासाठी बाजूलाही इन्सेक्ट नेट बसवली आहे. वरच्या ग्रीन नेटमुळे पाऊस किंवा ऊन थेट राेपांवर पडत नाही. यामुळे त्यांचे संरक्षण हाेते. प्लास्टिक ट्रेमध्ये नारळाचा भुसा व गांडूळ टाकून त्यात बिया राेवल्या जातात. यातून निराेगी राेप तयार हाेते. प्रती राेप जवळपास एक रुपया ते दीड रुपया दराने विक्री करतात. शेतकऱ्याने स्वत:चे बियाणे आणून दिले तर जवळपास ८० पैसे प्रती राेप चार्ज आकारून राेपे तयार करून दिली जातात.
मिरची, वांगे, टमाटर, कारले, झेंडू, काेबी किंवा इतर भाजीपाल्याची राेपे ऑर्डरप्रमाणे तयार केली जातात. राेपवाटिकेतील राेप राेगमुक्त राहत असल्याने सदर राेप खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. अशी माहिती शेतकरी महेश दिवटे यांनी दिली.