Join us

Dragon Fruit Farming : बारावीपर्यंत शिक्षण, शेतीत ड्रॅगन फ्रुटचा प्रयोग, आता लाखोंचं उत्पन्न 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 12:08 PM

Agriculture News : स्ट्रॉबेरीच्या शेतीनंतर या शेतकऱ्याने आधुनिकतेची कास धरत ड्रॅगनफुटची शेती फुलविले आहे.

नंदुरबार : सातपुड्यातील डोंगर माथ्यावरील अक्कलकुवा तालुक्यातील वालंबा शेतशिवारात स्ट्रॉबेरीच्या ( Strawberry farming) शेतीनंतर कोणवालपाडा येथील दिलीप पाडवी या शेतकऱ्याने आधुनिकतेची कास धरत ड्रॅगनफुटची (Dragon Fruit Farming) शेती फुलविले आहे. अर्धा एकरात लावलेल्या झाडातून त्यांना चांगल्या प्रकारे उत्पन्न हाती मिळत आहे.

बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या दिलीप बिज्या पाडवी यांची अडीच एकर शेती आहे. या एवढ्याशा क्षेत्रात भगर, मका असे पीक लावलेले आहे. तर, दहा गुंठ्यात मदर प्लेटमध्ये स्टॉबेरी लावली आहे. त्यांनी नाशिक (Nashik) जिल्ह्यातील बोरगाव येथे ड्रॅगनफ्रुटची शेती पाहिली होती. त्यानंतर त्यांनी विचार केला की, आपल्या भागातदेखील याची शेती केली जाऊ शकते. त्यानुसार त्यांनी नंदुरबार (Nandurbar) तालुक्यातील शिंदे येथून ड्रॅगनफ्रुटचे रोपे खरेदी केले व लागवड केली. यासाठी त्यांना ८० हजार रुपये खर्च करावा लागला आहे.

सुरुवातीला अर्धा एकर शेतात गेल्या वर्षी मे महिन्यात एका खांबावर चार रोप लावत, असे एकूण १२० खांब उभे करून त्यावर ४८० रोपे त्यांनी लावली होती. आज तेरा महिन्यांच्या कालावधीनंतर या ४८० ड्रॅगनफ्रुटच्या झाडांना आता फळ लागल्याने शेती बहरू लागली आहे. यातून शेतकऱ्याला चांगले उत्पन्नदेखील मिळत आहे. बाजारात दुर्मळ असलेले फळ सहज उपलब्ध होत असल्याने मोठ्या उत्सुकतेने नागरिक खरेदी करीत असल्याचे दिसून येत आहे.

सातपुड्यातील डाब, वालंबा येथील शेतकऱ्यांनी अगोदर स्ट्रॉबेरीची लागवड केली. त्यानंतर धडगाव तालुक्यातील बिजरी येथील एका शेतकऱ्याने सफरचंदाची रोपे लावली. पहिल्यांदा धडगावसारख्या अती दुर्गम भागात सफरचंदची शेती करण्याचा प्रयोग यशस्वी करण्यात आला. आता वालंबा येथील दिलीप बिज्या पाडवी या शेतकऱ्याने ड्रॅगनफ्रुटची लागवड करून सातपुड्याच्या शेतात नवोन्मुख प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. या शेतकऱ्यास तालुका कृषी अधिकारी निलेश गढरी, आत्मा प्रकल्पाचे संचालक दीपक पटेल, कृषी सहायक किरण पाडवी, दिलीप गावीत यांनी शेतकऱ्याला वेळोवेळी मार्गदर्शन केले.

शेतकऱ्यांच्या आशा झाल्या पल्लवीत

शेतातील ड्रॅगनफ्रुटची तोडणी करून ते मोलगी रस्त्याच्या कडेला छोटेखानी स्टॉल लावून २०० रुपये प्रतिकिलो प्रमाणे विक्री करत आहेत. सातपुड्यात स्ट्रॉबेरी, सफरचंद व आता ड्रॅगनफ्रुटची शेतीची लागवड यशस्वी करून शेतकऱ्याने आशा पल्लवीत केल्या आहेत.

टॅग्स :शेतीफळेशेती क्षेत्रनंदुरबार