Join us

Organic Farming : दोन एकरांवर सेंद्रिय शेतीचा प्रयोग, जळगावच्या शेतकऱ्याचा पॅटर्न चर्चेत, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 14:27 IST

Agriculture News : प्रयोगशील शेतकरी पाटील यांनी दोन एकरांत सेंद्रिय शेती (Organic Farming) फुलवत नऊ वर्षांपासून चांगले उत्पन्न घेत आहेत.

- जिजाबराव वाघजळगाव : साधारणतः सेंद्रिय शेतीबद्दल (Organic Farming) शेतकरी फारसे उत्साह दाखवत नाहीत. गेल्या काही वर्षांत निसर्ग बेभरवशी झाल्याने शेती (Farming) व्यवसाय करणे जिकिरीचे झाले आहे. तथापि, चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यातील दडपिंप्री येथील प्रयोगशील शेतकरी नाना भावसिंग पाटील यांनी आपल्या शेतीत सेंद्रिय प्रयोग फुलवला असून, दोन एकरांत नऊ वर्षांपासून चांगले उत्पन्न ते घेत आहेत. नाना पाटील यांना राज्य शासनाचा २०२१ चा शेतीमित्र पुरस्कारही जाहीर झाला आहे.

नापिकी, दुष्काळ, अतिवृष्टी आणि गारपीट, वादळवारा अशा नैसर्गिक संकटांनी एकीकडे शेतीमातीची वीण उसवली असतानाच बेसुमार प्रमाणात रासायनिक खतांच्या (Fertilizers) वापराने जमिनीची सुपीकताही कोमेजून गेली आहे. नाना पाटील यांनी ही मळलेली वाट टाळून आपल्या दोन एकरच्या तुकड्याला सेंद्रिय शेतीचा साज दिला. त्यांचा हा मॉडेल प्रयोग पाहण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातून शेतकरी येतात.

४७ वर्षीय नाना पाटील यांनी 'आत्मा' अंतर्गत सेंद्रिय शेतीच्या प्रयोगाची मुहूर्तमेढ केली. यासाठी त्यांना शासनाचे पाठबळ मिळाले. विशेष म्हणजे शासनानेच त्यांच्या या प्रयोगाचे सेंद्रिय शेती, असे प्रमाणिकरणही करून दिले आहे. शासनाची मदत आणि नाना पाटील यांचे कष्ट यामुळे सेंद्रीय शेतीचा मॉडेल प्रयोग फलद्रूप झाला आहे.

सेंद्रिय शेतीचा प्रवास 

दरम्यान २०१५ मध्ये त्यांनी दोन एकर शेतीत सेंद्रिय पॅटर्न रुजविण्याचे ठरविले. गांडूळखत, शेणखत यांसोबतच शेतातील काडीकचऱ्याचा बारीक भुगा करून तो त्यांनी शेतातच कुजवला. सेंद्रीयत्वाने जमिनीतील अनेक जीवाणूंचे संवर्धन होते. ते निसर्गचक्रासाठी आवश्यक आहे. पहिल्यावर्षी सेंद्रिय कपाशीचे उत्पन्न घेतले. यानंतर गेल्या ७ वर्षात बाजरी, हरभरा, ज्वारी अशी पिके घेतली. गेल्यावर्षी गंभीर दुष्काळातही त्यांनी शेतीचे हिरवेपण कमी होऊ दिले नाही. यंदा त्यांनी तुरीची लागवड केली असून, आंतरपीक म्हणून उडीद-मुगाचाही पेरा केला आहे. गेल्या नऊ वर्षांपासून नाना पाटील हे सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून उत्पन्नापेक्षाही सेंद्रीय शेती करण्याचे समाधान मोठे आहे, असे ते आनंदाने सांगतात. 

सेंद्रिय शेतीमुळे खर्चात बचत तर होतेच. शिवाय जमिनीची सुपीकता वाढून पर्यावरणाचा समतोलही राखला जातो. जीवाणू संवर्धनही चांगल्या प्रका होते. जास्त उत्पन्नाच्या हव्यासापोटी सद्यःस्थिती रासायनिक खतांचा अति वापन होत आहे. हे घातक असून, शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडेही वळले पाहिजे. - नाना भावसिंग पाटील, दडपिंप्री, ता. चाळीसगाव 

टॅग्स :सेंद्रिय शेतीसेंद्रिय भाज्याशेतीजळगाव