Join us

इराण, इराकनंतर आता सौदी अरेबियाला केळीची निर्यात, नांदगावच्या शेतकऱ्याचा प्रयोग 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 1:00 PM

नांदगाव तालुक्यात गिरणा नदीकाठी आपल्या लाल, तांबूस, केवटामिश्रित जमिनीत निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेतले आहे.

नाशिक :जळगाव जिल्ह्यात केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र आता बहुतांश शेतकरी केळी पिकाकडे वळू लागले आहेत. नाशिक जिल्ह्यातील नांद‌गाव तालुक्यातील बोराळे येथील राजपूत कुटुंबाने गिरणा नदीकाठी आपल्या लाल, तांबूस, केवटामिश्रित जमिनीत निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेत बाजारपेठेत विशेष ओळख तयार केली आहे. आतापर्यंत इराण, इराक येथे केळी पाठवली होती. यावर्षी केळीची वारी सौदी अरेबियाला केली जात आहे. जोडीला कापूस, ऊस, कांदा, पपई बहुविध पिकांमधूनही त्यांनी चांगले उत्पादन घेतले आहे. 

भिलासाहेब राजपूत कुटुंबाची गिरणा नदीकाठी ५५ एकर बागायती शेती असून, लहान भाऊ दादाभाऊ सोळुंके, साहेबराव सोळुंके, भाचे सुवर्णसिंग जाधव, पुतण्या नितेंद्र सोळुंके यांचे एकत्रित कुटुंब आहे. त्यांची कामात मदत होते. लहान पुतण्या बलरामसिंग राजपूत याला विदेशी बाजारपेठेच्या अभ्यासासाठी आफ्रिका, दुबई, थायलंड, इराण, इराक, सौदी अरेबिया, कुवेत या देशांमध्ये पाठविले. आधी अभ्यास केला, मग स्वतः आपल्या शेतातील व परिसरातील शेतकऱ्यांच्या मालाची निर्यात सुरू केली. आज ते स्वतः कांदा, केळी व कापूस विदेशात निर्यात करीत आहे.

बोराळे ते सौदी अरेबिया प्रवासकेळीची कटाई करून साफ केली जाते. नंतर तुरटीच्या पाण्यात धुवून ताजी केल्ली जाते. एका बॉक्समध्ये १३ किलो प्लॅस्टिकमध्ये पॅकिंग करून बॉक्समधील हवा काढली जाते. हा माल पिंपळगाव येथील अचिंड शीतगृहात ठेवला जातो. कंटेनरचा माल पूर्ण झाल्यानंतर तो उरणच्या 'जेएनपीटी' बंदरातून जहाजातून सौदी अरेबियाच्या बंदरात पाठवला जातो, या सर्व प्रक्रियेसाठी निलेश राजपूत त्यांना मदत करतात. शेतक-यांशी सुसंवाद साधत प्रत पाहून शेतमाल पसंत केला जातो. तसेच, पत्नी पूजा राजपूत या आर्थिक व्यवहार बघतात.

केळीच्या खर्चाच गणित केळीच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत एकरी किती खर्च येतो, हे पाहुयात... केळी लागवडीपूर्वी मशागत करावी लागते.  मशागतीसाठी ५ हजार, ठिबक सिंचनसाठी ४० हजार, जी ९ वाणाच्या केळी रोपासाठी २८ हजार, शेणखतासाठी २० हजार, रासायनिक खतासाठी ४० हजार, वॉटर सुलेबल मटेरियलसाठी १६ हजार, लहान रोप ड्रीचिंगसाठी ६ हजार, मजुरीसाठी २० हजार असा एकूण सरासरी खर्च : १ लाख ७५ हजार रुपयांपर्यत जातो. त्यानुसार केळीचे एकरी उत्पन्न ३५० ते ४०० क्विंटल उत्पादन निघत असते. जर क्विंटलला २००० ते २२०० रुपये दर मिळाला तर एकरी ६ ते ७ लाख रुपयांचं उत्पन्न निघत असते. 

मी कापूस खरेदी अधिकारी म्हणून गुजरातला काम केले आहे. पुतण्या बलरामसिंग याच्यासह जळगाव, धुळे व नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीमाल निर्यातक्षम कसा बनवावा व त्यापासून उत्पन्न कसे अधिक मिळेल, याचे मार्गदर्शन करीत आहे. - भिलासाहेब राजपूत, बोराळे

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

टॅग्स :शेतीनाशिककेळीसौदी अरेबियानांदगाव