अमळनेर : शेती उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी प्लॉट पाडले जाण्याचे प्रकार अनेक वर्षांपासून सर्वत्र वाढले आहेत. मात्र, कुटुंबाच्या आरोग्यासाठी अमळनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासमोर भर वस्तीतील इमारत पाडून तेथे स्वतःच्या कुटुंबासाठी सेंद्रिय भाजीपाला शेती करून आरोग्य जपण्याचा आगळावेगळा प्रयत्न सरजू गोकलानी यांनी केला आहे.
नेहमीचे चित्र पाहिले तर व्यावसायिक जागा अथवा शेती घेऊन त्यावर गगनचुंबी इमारती उभ्या करतात. यामुळे पिकांसाठी शेती राहील की नाही, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच विविध पिके व भाजीपाल्यावर कीटकनाशक फवारणी व रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे मानवी आरोग्यास हानी पोहोचत आहे. ही बाब लक्षात घेता आरोग्यासाठी गोकलानी यांनी त्यांची वापरात नसलेली इमारत विकण्याऐवजी ती पाडून त्यावर सेंद्रिय शेती केली आहे.
घेतले जातेय भाजीपाल्याचे उत्पादन
गोकलानी परिवारात ४० ते ५० सदस्य असून, सर्व एकत्र कुटुंब पद्धतीत राहतात. आधीच्या इमारतीजवळच नवीन इमारत बांधल्यावर आधीची इमारत विकण्याऐवजी फुटुंबीयांच्या आरोग्यासाठी नैसर्गिक सेंद्रिय शेतीसाठी ती पाहून भाजीपाल्याचे उत्पादन घेणे सुरू केले आहे. सुमारे 22 हजार चौरस फूट क्षेत्रातील इमारत पाडून शेती तर सुरु केलीच, सोबतच जॉगिंग ट्रॅकही बनवला आहे.
शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर अधिकाधिक होऊ लागला आहे. त्यामुळे सेंद्रिय शेतीकडे कल वाढू लागला आहे. शिवाय शेती जपली, जगली पाहिजे, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे. कुटुंबाचा आहार शुद्ध असेल तरच संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य चांगले राहू शकते, हा विचार लक्षात घेत कुटुंबाचे आरोग्य जपण्यासाठी इमारत विकण्याऐवजी ती पाहून शेती केली आहे. -सरजू गोकलानी, अमळनेर