येवला तालूक्याच्या सर्वच भागांत उन्हाचा चटका वाढत असताना शेततळ्यातील पाण्याचे योग्य नियोजन, यामुळे येवला तालुक्यातील देवठाण येथील संदीप अशोक पवार या शेतकऱ्याने मिरची अन् आले या पिकातून चार महिन्यांत तब्बल १८ लाख रुपये उत्पन्न मिळवले आहे. त्यामुळे एकीकडे पाण्यासाठी वणवण होत शेततळ्याच्या पाण्यावर सुयोग्य नियोजन करत शेतकरी पवार यांनी किमया करून दाखवली आहे.
बदलत्या परिस्थितीत पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत अन् कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन, यातून अवर्षणग्रस्त येवला तालुक्याच्या पूर्व भागातील देवठाणच्या संदीप अशोक पवार या शेतकऱ्याने मिरची व आले या दोन पिकांच्या माध्यमातून उत्पादन खर्च वजा जाता तब्बल १८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवण्याची किमया केली आहे. संदीप पवार या शेतकऱ्याने केलेली किमया सर्वांसमोर आदर्श निर्माण करणारी ठरली आहे.
दरम्यान वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४४६ मिलिमीटर असलेल्या अन् अवर्षणग्रस्त तालुका अशी ओळख असलेल्या संपूर्ण येवला तालुक्याला गतवर्षीच्या अत्यल्प पर्जन्यमानामुळे यंदाच्या वर्षी टंचाईच्या मोठ्या झळा सोसाव्या लागत आहेत. अशा परिस्थितीतही तालुक्याच्या देवठाण येथील संदीप अशोक पवार या शेतकऱ्याने लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. संदीप पवार यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून तळ्याची शेतात निर्मिती केली. त्यांनी एक एकरमध्ये हिरवी मिरची व दोन एकरांमध्ये लाल मिरचीची लागवड केली. संदीप पवार यांना हिरव्या मिरचीचे १५ टन उत्पन्न निघताना या मिरचीला प्रति किलो ४० रुपये दर मिळाला. तर, लाल मिरचीचे एकूण तीन टन उत्पन्न मिळाले.
खर्च किती आणि उत्पन्न किती? संदीप पवार यांना इस्राईल ठिबकसाठी २० हजार रुपये, मल्चिंग पेपरसाठी २० हजार, तसेच रोपे, खते व बुरशीनाशक, मजुरी : चार लाख ५० हजार रुपये खर्च झाला. त्यानंतर हिरवी मिरचीचे उत्पादन १५ टन निघाले. या मिरचीला प्रति किलोमागे ४० रुपये दर मिळाला. तर तीन टन लाल मिरचीला २९५ रुपये दर मिळाला. २संदीप पवार यांनी एक एकर शेतात आल्याची लागवड केली. त्यांना दहा टन आल्याचे उत्पन्न मिळून सरासरी ८५ रुपये किलोचा दर मिळाला. मिरची व आल्याच्या लागवडीतून संदीप पवार यांना खर्च वजा जाता १८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. उत्पादन घेताना पवार यांना कृषी सहायक संतोष गोसावी व कृषी पर्यवेक्षक विठ्ठल सोनवणे यांचे तांत्रिक मार्गदर्शन मिळाले.
संदीप पवार यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ७५ हजार रुपयांच्या अनुदानातून ३५ बाय ३५ मीटर आकाराच्या तळ्याची आपल्या शेतात निर्मिती केली. त्यांनी आपल्या सहा एकर क्षेत्रापैकी एक एकर मध्ये हिरवी मिरची (वाण-आर्मर) व दोन एकरमध्ये आयुर्वेदिक समजल्या जाणाऱ्या 'रेड पेपरीका' या लाल मिरचीची गेल्या वर्षीच्या ऑगस्ट व ऑक्टोबर महिन्यात ४ फूट बाय १.२५ फूट अंतरावर लागवड केली. 'शेतकरी बांधवांनी कृषी विभागाकडून अनुदानासोबतच तंत्रज्ञानाची अपेक्षा ठेवल्यास अपेक्षित कृषीविकास साधता येईल. - हितेंद्र पगार, मंडळ कृषी अधिकारी, अंदरसुल