जिजाबराव वाघ
जळगाव: जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमानामुळे यंदा पाणीटंचाईची परिस्थिती आहे. तथापि, 'विवेकी' शेती केल्यास दुष्काळालाही हिरवे तोरण बांधता येते आणि शेतीमातीतून 'पपई'चा गोडवाही मिळवता येतो. चाळीसगाव तालुक्यातील देवळी येथील विवेक पद्माकर रणदिवे या तरुण शेतकऱ्याने ही किमया साधली आहे. गत चार महिन्यांत एक एकरात लावलेल्या पपईने चांगले उत्पन्न मिळवून दिले आहे.
चाळीसगाव तालुक्यातील देवळी येथील विवेक रणदिवे हे आधुनिक पद्धतीने शेती करतात. त्यांनी शेतात ३ कोटी लिटर क्षमतेचे शेततळे तयार केले. यावर्षी पाऊस कमी झाला. तथापि, शेततळ्यांत पुढचे चार महिने पुरेल इतका जलसाठा आहे. पाण्याची तजवीज झाल्यावर त्यांनी एक एकरात पपई लागवडीचा प्रयोग केला. गेल्या चार महिन्यांपासून उत्पन्न हाती येत आहे.
दरम्यान नोव्हेंबर २०२३ पासून पपईचे उत्पन्न वेण्यास सुरुवात झाली. विशेष म्हणजे चाळीसगाव मालेगाव रस्त्यावरचं त्यांनी पपईची विक्रीही सुरु केली. सुरुवातीला 5 ते 6 क्विंटल तर सद्यस्थितीत दीड ते दोन क्विंटल उत्पन्न मिळत आहे. चार महिन्यात 5 ते 6 लाखांचे उत्पन्न मिळाले. पुढील सहा महिन्यात अजून 6 ते 8 लाखापर्यंत उत्पन्न मिळू शकते. मार्च, एप्रिल व मे या रणरणत्या उन्हाळ्यात देखील शेततळ्यातून 10 तास पाणी उपसा करता येणार आहे.
एकरात 800 रोपे
देवळी हे चाळीसगाव - मालेगाव रस्त्यावरील शहरापासून पश्चिमेला 13 किमी अंतरावरील पाच ते सात हजार लोकवस्तीचे गाव आहे. विवेक यांनी एक एकरात पपईची 800 झाडे जानेवारी 2023 मध्ये लावली. सोबतच शेततळेही तयार केले. यंदा आभाळमाया जेमतेम बरसली. मात्र शेततळ्यात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब साठवला गेला. याच पाण्यावर त्यांनी पपईची बाग फुलवली.
प्रयोगशील शेती करावी, या उद्देशानेचं पपई लागवड केली. सुरुवातीला दुष्काळाने घालमेल झाली. मात्र, शेततळ्याने आधार दिला. उत्पन्न घेऊन स्वतःच विक्रीही केल्याने चार पैसे मिळाले. पपईची बाग पाहण्यासाठी जिल्ह्यातून शेतकरी भेट देत आहेत.
- विवेक पद्माकर रणदिवे, प्रयोगशील शेतकरी, देवळी, ता. चाळीसगाव.