- राजू गेडाम
मनात जिद्द व चिकाटी असेल, तर शेतीत भरघोस उत्पन्न घेता येऊ शकते. शेतीमध्ये उत्पन्न पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याने आर्थिक आधार मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जाते. मात्र, मूल येथील युवा शेतकरी सुमित समर्थ यांनी हा दावा खोटा ठरवत अवघ्या पाच महिन्यांत शेवग्याचे भरघोस (Moringa Farming) उत्पन्न घेऊन आर्थिक समृद्धी साधली आहे.
विदर्भातील (Vidarbh) शेतकरी विशेषत: चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, सावली व पोंभुर्णा तालुका धानपट्ट्याचा भाग म्हणून ओळखला जातो. यापूर्वी धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात शेतकरी घेत होते. मात्र, निसर्गाच्या अवकृपेने धानाचे नुकसान होत होते. त्यामुळे शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याच्या पदरी निराशा पडत होती. लावलेला पैसाही निघत नसल्याने शेतकरी आत्महत्या करायला पुढे धजावत असल्याचे चित्र बघायला मिळते. धानापेक्षा फळबाग लावून आर्थिकदृष्ट्या सक्षम व अनेक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी येथील युवा शेतकरी सुमित समर्थ यांनी पुढाकार घेतला.
आपल्या शेतात त्यांनी प्रथमच शेवग्याची शेती केली. एक एकर शेतात त्यांनी पाच महिन्यांपूर्वी लागवड केली आणि योग्य व्यवस्थापनाच्या जोरावर शेवग्याच्या मोठ्या प्रमाणावर शेंगा लागल्या. या शेंगांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यातून त्यांना लाखो रुपयांचे उत्पादन मिळाले आहे. शेतीत नवनवीन प्रयोग करून ज्या फळांची बाजारपेठेत मागणी आहे, त्यांची लागवड केली, तर आर्थिक समृद्धी साधता येते. हे हेरून सुमित समर्थ शेतात राबत आहे व त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळत आहे. त्यामुळे ते शेतकऱ्यांचे प्रेरणास्रोत बनत आहेत. त्यांनी ‘नाही’ या शब्दाला बगल दिल्याने शेतीतून नवनवीन प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करीत आर्थिक उन्नती साधली आहे.
धानाच्या पट्ट्यात शेवगा शेतीचा वेगळा प्रयोग
विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोलीच्या (Gadchiroli) काही भागात भात शेती जाते. आजही अनेक कुटुंब भात शेतीच्या जोरावर आपला उदरनिर्वाह करत असतात. मात्र हळूहळू येथील शेतकरी देखील आधुनिक शेतीची कास धरून बागायती शेतीकडे वळू लागला आहे. कमीत कमी जागेत अधिकाधिक उत्पादन कसे येईल, याचा अभ्यास शेतकरी करू लागले आहेत. त्यातूनच सुमित यांनी शेवगा शेतीची वेगळी वाट चोखाळली आणि या वाटेवर त्यांना शेतीचा नवा अध्यायही सापडला आहे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांना देखील धान शेतीबरोबर इतरही पिकासाठी आग्रह होत असल्याचे चित्र आहे.