Join us

Success Story : कडू कारल्याने शेतकऱ्याच्या संसारात आणला गोडवा, कमी पाण्यात उत्पादन 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2024 4:25 PM

कारल्याची चव कडूः पण याच कारल्याने जळगावच्या शेतकऱ्याच्या संसारात 'गोडवा' फुलवला आहे.

जळगाव : यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतीला फटका बसला. मात्र कमी पाण्यात जळगावच्या शेतकऱ्याने कारल्याची बाग फुलवली आहे. कारल्याची चव कडूः पण याच कारल्याने या शेतकऱ्याच्या संसारात 'गोडवा' फुलवला आहे. कारल्याच्या शेतीतून या शेतकऱ्याला पहिल्याच तोड्यातून ६० हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. 

जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील भातखंडे येथे शेतकरी अतुल शांताराम महाजन यांनी त्यांच्या आठ एकर क्षेत्रांत ठिबक सिंचनाद्वारे मल्चिंग पेपर लागवड २२ ते २६ जानेवारीदरम्यान केली. यूएस१३/१५ या कंपनीच्या बियाण्याची त्यांनी लागवडीसाठी निवड केली. मल्चिंग बेडवर ५ बाय १.५ फूट अंतराने लागवड केली. कारल्याचे वेल उभे करण्यासाठी टोकर, तार, सुतळी व दोराचा वापर करण्यात आला. या वेलींवर वेगवगळ्या सहा फवारणी झाल्या आहेत. महाजन यांनी यावर्षी पावसाळा कमी असल्यामुळे कमी पाण्यावर येणारे उत्पन्न निवडले व आठ एकर क्षेत्रात कारले पिकाची लागवड केली. कमी पाणी व फारच कमी खर्चात त्यांनी मळा फुलवला आहे.

कमी पावसामुळे घेतले कारल्याचे उत्पादन

कारल्याचा पहिला तोडा नुकताच करण्यात आला असून, सुमारे १९ क्विटल कारले घेण्यात आले. साधारण पाच ते सहा महिन्यांपर्यंत बाजारात ३० ते ३५ रुपये किलो याप्रमाणे कारल्याची विक्री होत आहे. सध्या कारल्याला बाजारात मिळालेला दर हा समाधानकारक असल्याचे महाजन यांचे म्हणणे आहे. हे कारले विक्रीसाठी पाचोरा, पारोळा, अमळनेर, भुसावळ, सुरत, धुळे, वाशी, कल्याण मार्केटमध्ये पाठवले जाते. सध्या कारल्याचे उत्पादन अन्य ठिकाणी कमी असल्याने या कारल्यांना मागणी आहे.

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती न करता आधुनिक शेतीकडे वळावे व भरघोस उत्पन्न घ्यावे. तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता कमी क्षेत्रात भाजीपाला व फळबाग उत्पादन घेतले तर निश्चितच चांगले अर्थार्जन होऊ शकते.

-अतुल शांताराम महाजन, शेतकरी, भातखंडे बुद्रुक

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

टॅग्स :शेतीजळगावशेतकरीपाणी