- दयाल भोवते
Farmer Success Story : शिक्षण घेऊन देखील शासकीय नोकरभरती न निघाल्याने कामाच्या शोधात असलेल्या एका गावातील तब्बल ३२ युवकांनी नजीकच्या ३ जिल्ह्यातील १२ गावात रसवंती व्यवसाय थाटून बेरोजगारीवर (Farmer Success Story) मात केली आहे. ही यशोगाथा आहे, भंडारा जिल्ह्यातील (Bhandara District) लाखांदूर तालुक्यातील पाहूणगाव येथील युवकांची.
पाहूणगाव हे गाव लाखांदूर ते पवनी मार्गावर आहे. जवळपास १७०० लोकसंख्या असलेल्या या गावातील बहुतांश नागरिक शेती करतात, शेतीमध्ये प्रामुख्याने धान पिकाची व भाजीपाला पिकाची लागवड (Vegetbale Farming) केली जाते. जवळपास २०-२५ वर्षांचे तरुण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात होते. ६ वर्षापूर्वी पाहूणगाव येथील गोलू वामन कोरे या तरुणाने रसवंतीचा व्यवसाय (Sugarcane Juice) सुरू केला. तो गावोगावी फिरून रसवंतीचा व्यवसाय करायचा.
व्यवसायाच्या माध्यमातून गोलू चांगली कमाई करू लागला. त्याच्या उद्यमशीलतेतून प्रेरणा घेऊन पाहूणगाव येथील तरुणही या व्यवसायाकडे वळले. स्वतःकडे असलेल्या शेतीचा वापर करून व्यवसाय केला तर अशी कल्पना या युवकांच्या डोक्यात आली. या युवकांनी गावालगतच्या मालकी शेतात उसाची लागवड (Usacha Ras) करायला सुरुवात केली.
उसाच्या रसाला मागणी
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने लिंबू शरबत, थंड पाणी, उसाचा रस आणि फळे यांचे मोठ्या प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांकडून दिला जातो. त्यानुसार जवळपास १५ रुपये ग्लास प्रमाणे अत्यंत कमी खर्चात उपलब्ध होणाऱ्या उसाच्या रसाला उन्हाळ्यात मोठी मागणी असते.
शेतातून निघालेला ऊस इतरत्र न पाठवता त्याचा रस काढून त्यांनी रसवंतीचा व्यवसाय थाटला. दिवसागणिक युवक वाढत गेले आणि गावातील शेतात लावलेला ऊस कमी पडू लागल्याने या युवकांनी नजीकच्या जिल्ह्यातून ऊस खरेदी करून व्यावसाय कायम ठेवला आहे. गावातच रोजगार शोधल्याने त्यांना मुळ अडचणींचा सामना करावा लागला नाही. मात्र ऊस पिकासाठी अन्य जिल्ह्यात धाव घ्यावी लागत असल्याचे वास्तव आहे.
पाहता पाहता बनला २४ तरुणांचा समूह
पाहुणगाव येथील २४ तरुणांच्या या समूहाने भेडारा, गडचिरोली वा गोंदिया या जिल्ह्यातील गावागावात जाऊन व्यवसाय सुरू केला आहे. पाहूणगावच्या या तरुणांनी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथे ४, भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे ४, पाहूणगाव येथे २, आसगाव येथे १, सेंद्री येथे १, सिंदपुरी येथे १, विरली येवे २, नेरला येथे २, पवनी येथे १ तर गडचिरोली जिल्ह्यातील आमगाव येथे १, वहसा येथे ४, शिरबुडी येथे १ असे तब्बल ३ जिल्ह्यातील १२ गावात रसवंतीचा व्यवसाय थाटला आहे. तरुणांना रोजगारही उपलब्ध झाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटला आहे. तरुणांचा हा पुढाकार अन्य तरुणांसमोर नक्कीच प्रेरणादायी ठरला आहे.