Godavari Tur : पैठणच्या लव्हगळे कुटुंबाने २५ एकर क्षेत्रात मोसंबीच्या फळबागेत (Mosambi Farming) गोदावरी तुरीची लागवड (Tur Cultivation) केली. यात मध्यतंरीच्या पावसामुळे जवळपास दहा एकरावरील पिकाचे नुकसान झाले. मात्र यावर यशस्वी मात करीत आजच्या घडीला तूर पिकातून 130 क्विंटलचे उत्पादन आणि मोसंबी पिकातून 61 लाख रुपयांचे उत्पन्न लव्हगळे कुटुंबाने घेतले आहे.
पैठण तालुक्यातील (Paithan Taluka) ब्रम्हगाव हे गाव नाथ सागराच्या डाव्या कालव्याला लागून असल्याने पाण्याची कसलीच कमतरता नाही. याच कालव्यातून पाईप लाईन करून जवळच्या खेड्यात शेतकऱ्यांनी आपली शेती हरित केली आहे. या गावात जालिंदर, कल्याणराव, बप्पासाहेब, श्रीकृष्ण असे चोघे भाऊ एकत्रित शेती करतात. त्यात बाप्पासहेब हे शिक्षक.असल्याने आठवडी येणे जाणे असते.
या कुटुंबाकडे 25 एकर क्षेत्रापेक्षा अधिक मोसंबी फळबागेचे क्षेत्र आहे. ही फळ बाग साधारण चार वर्षाची वयाची आहे. बाप्पासाहेब लव्हगळे खरीप 2024 मध्ये विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्रातून बियाणे खरेदी केली. त्यांनी या मोसंबी क्षेत्रात आंतरपीक म्हणून तूर पिकाची निवड केली. तत्पूर्वी त्यांना खरीप 2023 मध्ये 1 किलो तूर गोदावरी वाण पेरणीसाठी दिला होता. त्यात एक किलोपासून सहा क्विंटल तूर उत्पादन मिळाल्याचे ते सांगतात.
मिळाले 130 क्विंटल उत्पादन
लव्हगळे कुटुंबाने 25 एकर मोसंबी फळबागेत कृषि संशोधन केंद्र बदनापूर निर्मित बी डी एन 2013 -41 या वाणाची लागवड केली. मागील खरिपात पाऊस खूप झाला, यातील जवळपास 10 एकर क्षेत्रात पाणी साचल्याने तूर पिकाचे नुकसान झाले. मात्र १५ एकरावरील पीक साबूत राखण्यात लव्हगळे कुटुंबाला यश आले. या उर्वरित 15 एकर क्षेत्रात त्यांना मोसंबी फळपिकात आंतरपीक म्हणून घेतलेल्या तूर गोदावरी वाणापासून 130 क्विंटल उत्पादन मिळाले.
शिवाय मोसंबी फळ झाडापासून (आंबे बहर) 61 लाख आल्याचे कल्याणराव लव्हगळे यांनी सांगितले. मोसंबी उत्पादन वाढीसाठी मोसंबी फळबाग तज्ञ डॉ. मोहन पाटील यांचे मार्गदर्शन, तर तूर पिकासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गृत कृषि संशोधन केंद्रातील डॉ. दीपक पाटील, डॉ. किरण जाधव याचे सहकार्य लाभले.
बाजारातील दर महत्वाचा
या लव्हगळे कुटुंबाची गावात जवळपास शंभर एकरच्या पुढे शेती आहे. डावा कालवा येण्यापूर्वी ही सर्व शेती कोरडवाहू होती, पण सुदैवाने कालवा काही फुटावर असल्याने ही सर्व शेती बागायती झाली. पण शेतीत पाणी मिळाले म्हणजे लगेच उत्पन्न वाढले, असे होत नाही. डोबळ विचार करता शेतीत मिळालेले उत्पादन यात टन, क्विंटल, किलो या परिमानात गणना होते. पण जेव्हा हे उत्पादन मार्केटमध्ये विक्री होईल, त्यावेळी येणारा पैसा हा उत्पन्न असतो. त्यामुळे केवळ उत्पादन वाढ बऱ्याच वेळेस शेतकरी बांधवांना समाधान देत नाही. त्यासाठी बाजारातील दर हे फार महत्वपूर्ण ठरतात.
तुरीचे गोदावरी वाण शेतकऱ्यांच्या पसंतीस
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ विकसित तुरीचे गोदावरी वाण शेतकऱ्यांना चांगलेच पसंतीस पडले आहे. यंदाच्या खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांना भरगोस उत्पन्न देणारे वाण ठरले आहे. मागील सात वर्षापासून तुरीचे हे वाण विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्रात उपलब्ध आहे. खरिपात वेळेवर उपलब्ध केल्याने त्याचा उपयोग छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाण प्रसार आणि उत्पादन वाढीसाठी झाला.
- रामेश्वर ठोंबरे, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र, छत्रपती संभाजीनगर