Join us

Farmer Success Story : निफाडच्या तरुणाने अंजिराच्या शेतात उभारला सायन्स पार्क, वाचा यशोगाथा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 17:05 IST

Farmer Success Story : जिद्द आणि कष्टातून दोघांनी जीवनात जगण्याची नवी वाट निर्माण करत सायन्स पार्क (Science Park) उभे केले. 

Farmer Success Story : उच्चशिक्षित असलेल्या रमेश यांनी २०१७ मध्ये नोकरीला रामराम करत गावची वाट धरली. वडिलोपार्जित शेतीला जवळ केले. पारंपरिक शेतीला आधुनिक शेतीची जोड देत फलोत्पादनाची (Fruit Farming)  कास धरली. या कामी पत्नीने खंबीरपणे साथ दिली. जिद्द आणि कष्टातून दोघांनी जीवनात जगण्याची नवी वाट निर्माण करत सायन्स पार्क (Science Park) उभे केले. 

नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) निफाड तालुक्यातील कोठुरे येथील रमेश मोगल यांची कौटुंबिक परिस्थिती पूर्वी हलाखीची होती. प्रतिकूल परिस्थितीत २००३ मध्ये त्यांनी रसायनशास्त्र विषयात पदवी व २००५ मध्ये जैवतंत्रज्ञान विषयात पदव्युत्तर पदविका घेतली. त्यानंतर रासायनिक कंपनीत नोकरी मिळाली. मात्र १० वर्षे नोकरीतील कालावधीत ॲलर्जी, खोकला आदी त्रास असाह्य होऊ लागले. नोकरी सोडावी असा विचार आला. पण जगायचं कसं, असा प्रश्‍नही समोर होता.

दरम्यान २६ जानेवारी २०१८ मध्ये ‘डिलिजन्स फार्म’ नावाने कृषी पर्यटनास सुरुवात केली. ‘डिलिजन्स’ म्हणजे परिश्रम. नाशिक-औरंगाबाद महामार्गाशेजारीच निसर्गाच्या सानिध्यात हे क्षेत्र आहे. सुरुवातीला कुटुंबीय व नातेवाइकांचा या व्यवसायास विरोध होता. पण मोगल दांपत्याने कोणताच कमीपणा वाटू न देता हिमतीने प्रयत्नांना दिशा दिली. व्यावसायिक धोरण,दृष्टिकोन व सेवा- सुविधा यांचा सूक्ष्म अभ्यास केला. 

नोकरीतील काही रक्कम व कर्जाद्वारे १० ते १२ लाख गुंतवणूक केली. नैसर्गिक शेती, चुलीवरची मिसळ, मुलांसाठी सहलीचे ठिकाण आणि स्विमिंग पूल अशा गोष्टींची सुरुवात करत आज व्यवसाय नावारूपाला आल्यानंतर आपली आवड जोपासात अर्ध्या एकर क्षेत्रावर पसरलेल्या २५० अंजीरच्या दाट झाडीत सायन्स पार्क ची निर्मिती केली. सध्या मुलांसाठी "हसतं खेळतं विज्ञान" म्हणून विज्ञान उद्यान सुरू आहे. मुलांनी शाळेच्या चार भिंती सोडून येथे येऊन खेळता खेळता विज्ञान शिकावे या उद्देशाने अत्यंत माफक फी मध्ये दाट झाडीतील सायन्स पार्क अनुभवता येणार आहे.

मिश्र फळशेतीचा प्रयोग सन २०१८ मध्ये पेरू, अंजीर, लिंबू, चिकू, जांभूळ, नारळ अशी विविधता जोपासण्यास सुरुवात केली. सघन पद्धतीच्या लागवडीतून कृषी पर्यटनास पोषक वातावरण निर्माण केले. आज आंब्याची सुमारे १७०, पेरू सरदार ४९ वाणाची २५० झाडे तर आंध्र प्रदेशातून आणलेल्या अंजिराच्या एलिफंट इअर वाणाची २५० झाडे आहेत. शिवाय लिंबू ५०, चिकू १५, जांभूळ २, करवंद २, नारळ १७० व शेवगा ५० झाडांची समृद्धी तयार केली आहे.

सायन्स पार्क मध्ये हे बघायला मिळेल...या सायन्स पार्कमध्ये तरफ, उतरण, कप्पी, न्यूटनचा पाळणा, कॅलिडोस्कोप, गियरची गुणोत्तरे, गमतीदार आरसे, आरशांचे अनंतपथ, कुजबुजणाऱ्या तबकड्या, दोलकांचे तरंग, दोलकांचे झोके, कनवाळू झोका, गुरुत्वाकर्षण विहीर, मोबीयसची पट्टी, आर्किमिडीजचा स्क्रू, संगीतमय नलिका, गडगडणारे स्पर्धक, दृष्टी भ्रम, बेनहॅमची तबकडी, न्यूटनची तबकडी, वस्तुमान व परिभ्रमण करणाऱ्या वस्तूंचे जडत्व इत्यादी...

शेतीव्यवसायाला कृषी पर्यटनाची जोड देत चार भिंती बाहेरील विज्ञान अनुभवण्यासाठी सायन्स पार्क ची निर्मिती केली. नैसर्गिक वातावरणात आनंददायी विज्ञान अनुभवताना वेगळं सुख मिळतय.- रमेश मोगल, कोठूरे 

दोन्ही बहारामध्ये छाटणी घेत अंजीराचे दर्जेदार उत्पादन घेणारे शेतकरी जालिंदर डोंबे यांची यशकथा

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरीनाशिकविज्ञान