नाशिक : जंगल हा शब्द जरी कानावर आला की मनात भीती निर्माण होते. जंगलाचे व त्याठिकाणी राहणाऱ्या वन्यप्राण्यांचे संरक्षण करण्याचे आव्हान पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला वनरक्षक वर्षानुवर्षे लीलयापणे पेलत आहे. वन्यप्राण्यांची शिकार व खैर, सागासारख्या मौल्यवान वृक्षप्रजाती तस्करी रोखताना या वनरागिणी सर्व काही विसरून लढा देतात. त्यांच्यापैकीच एक सिन्नर वनपरिक्षेत्रातील वत्सला कांगने, बान्हेच्या सुशीला लोहार, त्र्यंबकच्या रत्ना तुपलोंढे या आहेत. या जिगरबाज वनदुर्गाचा थरारक अनुभव अंगावर शहारे आणणारा आहे.
कोल्हा, उदमांजराच्या शिकाऱ्यांना रंगेहात पकडले
सिन्नर वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील एका राखीव वनक्षेत्रात घुसखोरी केल्यानंतर कोल्हा, उदमांजरची शिकार करून रिक्षामधून त्यांचे मृतदेह एका गोणीत भरून वाहतूक करणाऱ्या दोघांना वनरक्षक वत्सला कांगने यांनी भररस्त्यात एकटे असूनही ताब्यात घेतले होते. मागील वर्षी जुलै महिन्यात देवपूर मानमोडा रस्त्यावर ही कारवाई त्यांनी केली होती. दुचाकीने या भागात गस्त करत संशयास्पद वाहनाचा त्या शोध घेत होत्या. संध्याकाळची वेळ असताना त्यांनी संशयास्पद रिक्षा ओळखून ती रोखली. रिक्षामधून एक तरुण व एक वयस्कर संशयित आरोपीना लोकांच्या मदतीने थांबवून ठेवले होते. वनक्षेत्रपाल मनीषा जाधव यांच्याशी तत्काळ संपर्क करून अतिरिक्त कुमक मागवून घेतली होती. या दोघांविरुद्ध वन्यजीव कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जंगलात अडकलेल्या युवकाला मध्यरात्री केले रेस्क्यू
'किर्रर्र अंधार... काळजात वर्रर्र करणारा रातकिड्यांचा आवाज मध्यरात्रीचे दीड-दोन वाजेची वेळ जंगलात एका डोंगरावर २०२१ साली अडकलेल्या युवकाचा शोध वनपथकाकडून घेतला जातो. रत्ना तुपलोंढे या एकमेव महिला वनरक्षक पथकात होत्या, त्र्यंबकेश्वरच्या हरिहर गडाच्या समोरील ब्रह्मा डोंगर परिसर जो बिबट्यांच्या अधिवासासाठी ओळखला जातो. या भागात मुंबईहून आलेला एक युवक रस्ता भरकटला होता. सुदैवाने त्याच्या मोबाइलला रेंज असल्याने तो पथकाच्या संपकात राहिला होता...
अंधारात बॅटरीच्या प्रकाशझोतात शोध घेत असताना तुपलोंढे यांच्या कपड्यात सरपटणारा जीव शिरल्याने त्यांच्या मनात सर्पदंशाची भीती दाटली. त्यांनी वरूनच त्या जीवाला पकडून ठेवले अन् कसेबसे बाहेर काढले. तर तो सरडा निघाला अन् त्यांचा जीव भांड्यात पडला, तेथून त्यांनी पुन्हा शोधमोहीम सुरू केली आणि मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास त्या युवकाला सुरक्षितरीत्या डोंगरावरून खाली आणले, वनसेवेत नोकरीत रुजू होताच बाऱ्हे वनपरिक्षेत्रात कर्तव्य पार पाडण्याचे आव्हान तुपलोंढे यांच्यासमोर उभे राहिले, त्यावेळीही त्यांनी मोठ्या धाडसाने सात वर्षे या भागात सेवा करून खैर तस्करांचा पाठलाग करताना सुतारपाडा येथे दगडफेकीचा सामना केला होता.
चाकाच्या निशाणावरून माग अन् टोळीचा घेराव...
गुजरात सीमेला लागून असलेल्या बान्हे वनपरिक्षेत्राच्या सुशीला लोहार यांनी खैर तस्करांच्या वाहनाचा माग रस्त्यावर उमटलेल्या चाकाच्या निशाणावरून काढला, दुपारी साडेचार वाजेपासून पथकासोबत माग काढताना संध्याकाळी जंगलाजवळच्या टोकारपाडा या गुजरातमधील पाड्यावर त्यांचे पथक जाऊन पोहोचले; मात्र तोपर्यंत त्यांना ते लक्षात आलेले नव्हते. काही क्षणातच त्यांना तस्करांना मदत करणाऱ्या टोळीने घेराव घातला, वाहनावर दगडफेक सुरू केली. यावेळी त्यांच्यासोबत अलका भोये या अजून एक महिला वनरक्षक होत्या.
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून या दोघी वनदुर्गानी टोळीचा दगडफेकीचा सामना करत सुटका करून घेतली. पुन्हा गोपनीय माहिती कानी आली लोहार या पथकासोबत त्यादिशेने निघाल्या. गोपाळपूर भागात एका जंगलात काही तस्कर खैराचे ओंडके वाहनात भरताना आढळून आले. त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला असता अंधाराचा फायदा घेत ते निसटले. मात्र खैराचे १७ नग आणि तस्करीसाठी वापरलेले वाहन जप्त करण्यास त्यांना यश आले होते.