Join us

Success Story : शिंगाड्याच्या शेतीतून आठ महिन्यांत चांगलं उत्पन्न, गडचिरोलीच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 20:55 IST

एका शेतकऱ्याने शेतातील बोडीच्या मदतीने शिंगाड्याची शेती करून आठ महिन्यांत दीड लाखाचे उत्पन्न घेतले.

गडचिरोली : शेतीतील वाढता लागवड खर्च आणि तीच ती पिके घेतली जात असल्याने जमिनीचा पोतदेखील खालावत चालला आहे, तर शेती करणे तोट्याचे होत चालले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्याची भावना वाढत आहे. मात्र, नैराश्येच्या गर्तेतून बाहेर येत तिरोडा तालुक्यातील बिहिरिया येथील एका शेतकऱ्याने शेतातील बोडीच्या मदतीने शिंगाड्याची शेती करून आठ महिन्यांत दीड लाखाचे उत्पन्न घेतले. यात त्यांना ९० हजार रुपयांचा शुद्ध नफा झाला. बोडीमध्ये शिंगाड्याची यशस्वी शेती करून त्यांनी शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण करून धान पिकाला पर्यायसुद्धा दिला आहे.

डुलीचंद नारायण पटले, रा. बिहिरिया असे शिंगाड्याची यशस्वी शेती करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. पटले यांच्याकडे एकूण तीन एकर शेती आहे. खरीप हंगामात भात पीक, रब्बी हंगामात गहू, कोरडवाहू पिकांची लागवड करतात. धान पीक म्हटले की जास्त व हमखास उत्पादनासाठी संरक्षित सिंचनाची गरज असते. धानाच्या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते समाधानी नव्हते.

यासाठी ते सतत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. सन २०१५-१६ वर्षी त्यांच्या गावाची निवड सेंद्रिय शेतीसाठी झाली. मी सुद्धा त्यात स्वेच्छेने सहभागी झाल्याचे ते म्हणाले. सुरुवातीला ही शेती नवीन वाटली; परंतु त्या शेतीत वापरले जाणारे खत हे बाजारपेठेतून न आणता घरच्या घरी तयार करण्याचे प्रशिक्षण कृषी सहायक अजय खंडाईत यांनी दिले. त्यामुळे खतावरील खर्चाची बचत झाली. त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या वर्षीच मी एक एकर शेती संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने केली. त्यासाठी लागणारे दशपर्णी अर्क, जीवामृत, बीजामृत, गांडूळ खत, हिरवळीचे खत घरीच तयार केले. 

शेतात तयार केली बोडी 

हळूहळू उत्पादनात वाढ होऊन खर्चाची बचत झाली. बाजारात माझ्या तांदळाची मागणी वाढली. रासायनिक तांदळाच्या तुलनेत प्रतिकिलो १५ रुपये जास्त मिळू लागले. कृषी विभागांतर्गत मागेल त्याला बोडी योजनेतंर्गत शेतात बोडी तयार केली. बोडीत शिंगाड्याची लागवड करण्याचा निर्णय घेतला, कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनात बोडीत शिंगाड्याची लागवड केली. ८ महिन्यांच्या कालावधीत पीक हातात आले.

बोडीच्या माध्यमातून झाला तिहेरी लाभ

विशेष म्हणजे शिंगाडा पिकाला कोणत्याही प्रकारचा रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होत नाही. मशागतीचा खर्च कमी येतो. शिंगाड्याची बाजारात विक्री करण्याची गरज नाही. छोटे-छोटे व्यापारी बांधावर येऊन शिंगाडे खरेदी करतात. मागील हंगामात शिंगाड्याच्या शेतीतून १ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यातून खर्च वगळता ९० हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळाला. त्यानंतर बोडीत पाणी शिल्लक असल्याने त्यात मत्स्यबीज सोडले. ते आता एक ते दीड किलोपर्यंत झाले आहे. त्यामुळे बोडीचा तिहेरी लाभ झाल्याचे पटले यांनी सांगितले.

टॅग्स :शेतीगडचिरोलीशेती क्षेत्रमच्छीमार