Join us

Success Story : तीन आठवड्यात चांगलं उत्पन्न, वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यशस्वी रेशीम शेती 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 2:19 PM

त्यामुळे कमी कालावधीत भरघोस उत्पन्न देण्यासाठी रेशीम शेती फायद्याची ठरते आहे. 

वर्धा : आपल्याकडे पारंपरिक शेती केली जात असल्याने शेतकऱ्यांना नेहमीच नुकसानीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी शासनाकडूनही विविध योजना राबविल्या जात असून, शेतकऱ्यांनीही आधुनिकतेची कास धरल्याचे दिसून येत आहे. यातूनच जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने शेतकऱ्याने रेशीम शेतीच्या माध्यमातून केवळ तीन आठवड्यांमध्ये ८५ हजार ७५४ रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. त्यामुळे कमी कालावधीत भरघोस उत्पन्न देण्यासाठी रेशीम शेती फायद्याची ठरते आहे. 

वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यामधील वाहितपूर येथील शेतकरी अमित अरुण वरघणे यांनी एप्रिल महिन्यातील कडक उन्हाळ्यात एक एकरातील तुती पाल्याचा वापर करुन १५० अंडीपुंजाचे चॉकी घेऊन फक्त २२ दिवसांमध्ये १६१.८०० किलोग्रॅम कोष उत्पादित करून ८५ हजार ७५४ रुपयांचे उत्पन्न घेतले.

उन्हाळ्यातील रेशीम बॅच यशस्वी करण्यासाठी कीटक संगोपनगृहाभोवती बारदाने लावून, तसेच शेडच्या टिनावर रेनगन पाइप बसवून तापमान आर्द्रता नियंत्रण करण्याचे काम केले; परंतु सुसाट वारा, पाऊस यामुळे शेडचे नेट व बारदाने फाटून रेशीम कीटक असलेले बेड उलथापालथ झाले. यातही हिंमत न हरता अमित व त्यांचे आई, वडील व संपूर्ण कुटुंबाने सर्व परिस्थिती हाताळली व चांगले दर्जाचे रेशीम कोष उत्पादित करून उन्हाळ्यातही कमी दिवसांत जास्त उत्पादन होऊ शकते, हे दाखवून दिले.

किमान एक एकरात रेशीम शेती कराकडक उन्हाळ्यामध्येही पिकाचे सुनियोजित व्यवस्थापन केले तर कमी दिवसांतही जास्त उत्पादन होऊ शकते हे अमित वरघणे यांनी दाखवून दिले आहे. इतर शेतकऱ्यांनीही त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन किमान एक एकरामध्ये रेशीम शेती करून आपले उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत व आपले जीवनमान उंचवावे, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी यांनी केले आहे.

फायदा होताच लागवड क्षेत्र वाढविलेअमित वरघणे यांनी वर्ष २०२२-२३ मध्ये एक एकरामध्ये तुती लागवड केली. पहिल्याच वर्षी शेड बांधकाम करून यशस्वी बॅचेस घेतल्या. कमी कालावधीमध्ये इतर पारंपरिक पिकांच्या तुलनेमध्ये भरघोस उत्पन्न मिळवून देणारी रेशीम शेती ही एकमेव शाश्वत शेती आहे, याची प्रचिती येताच पुन्हा एक एकर तुती लागवड वाढवून दोन एकरमध्ये त्यांचा रेशीम उद्योग सुरू आहे. 

टॅग्स :शेतीनागपूरवर्धारेशीमशेतीशेती क्षेत्र