- अरुण राजगिरे
गडचिरोली : हल्ली तरुण वर्ग शिक्षणाबरोबरच शेतीतही मेहनत घेत शेती यशस्वी करून दाखवत आहेत. तर अनेकजण शेतीचे इत्यंभूत शिक्षण घेत शेतीत नवनवे प्रयोग करत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील (Gadchiroli) पदवीधर तरुणाने आपल्या शेतीत भाजीपाल्याचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. मुळातच हा भात पट्टा (Rice Crop) म्हणून ओळखला जातो, मात्र या तरुणाने चवळीच्या शेतीतून चांगलं उत्पन्न मिळवले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. मात्र धान शेतीत खर्च अधिक व उत्पादन कमी अशी स्थिती आहे. येथील वातावरण व जमीन इतरही नगदी पिकांसाठी पोषक अशी आहे. मात्र शेतकरी प्रयोग करून जोखीम उचलण्यास तयार होत नाही. काही मोजकेच शेतकरी नवीन पिकांची लागवड करून पैसे कमावतात. पावसाळ्याच्या कालावधीत भाजीपाल्याला (Vegetables farming) चांगला भाव मिळते. त्यामुळे कमलेश बारस्कर यांनी चवळीच्या शेंगांची लागवड दोन वर्षांपूर्वी अर्धा एकरात केली.
सुरुवातीला अनुभव कमी असल्याने त्यांना कमी उत्पादन झाले. मात्र दरवर्षीचा अनुभव गाठीशी बांधत चवळीच्या पिकांची चांगली काळजी घेण्यास सुरुवात केली. आता ते पाऊण एकरात चवळीची लागवड करतात. त्यातून जवळपास एक लाख रुपयांचे उत्पादन घेतात. त्यांनी केलेला शेतीतील प्रयोग परिसरातील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. स्वतः शिक्षित असल्याने कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार पिकांची लागवड केली.
झाडांना दिला दोऱ्यांचा आधार
कमलेश बारस्कर हे चवळीच्या शेंगांचे उत्पादन प्रामुख्याने पावसाळ्यात घेतात. चवळी हे वेलवर्गीय पीक आहे. ते जर जमिनीवर परसरले तर सततच्या पावसामुळे खराब होण्याचा धोका असते. त्यामुळे कमलेश यांनी पिकाला दोऱ्यांचा आधार दिला आहे.