एकीकडे उन्हाची जीवाची लाही लाही झाली असून पाणीटंचाईने शेतीपिकांवर परिणाम झाला आहे. मात्र अशाही परिस्थितीत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील भोकणी परिसरात ग्रामपंचायतीने खडकाळ माळरानावर २७ प्रकारच्या कमळाच्या जातीच्या रोपांची लागवड करून बाग फुलवली आहे. या उपक्रमाला ग्रामविकास मंचच्या कार्यकर्त्यांनी लोकसहभागातून हातभार लावला.
सध्या राज्यातील बहुतांश भागात भीषण पाणीटंचाई सुरु आहे. तर काही भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिकच्यासिन्नर तालुक्यात देखील पाणी टंचाई आहे, मात्र या पाणीटंचाईवर मात करण्यात भोकणी ग्रामपंचायतीला यश आले आहे. ग्रामपंचायतीच्या जागांवर बऱ्याचदा अतिक्रमण होत असते. या ग्रामपंचायतीकडे देखील पडीक जमीन असल्याने त्यावर कमळाची बाग फुलवली आहे. आता कमळ बागेची उभारणी केल्यामुळे याठिकाणी ग्रामस्थ अतिक्रमण करणार नाहीत. हा उद्देशदेखील साध्य होणार आहे.
दरम्यान कमळ रोपांची नर्सरी बनवून व गप्पी मासे केंद्र स्थापित करून ग्रामपंचायतीच्या उत्पन्न वाढीला हातभार लागू शकतो. सरपंच अरुण वाघ यांच्या संकल्पनेतून या कमळ बागेची उभारणी करण्यात आली आहे. कमळ बागेसाठी तीन फूट उंच व सहा फूट गोल व्यासाच्या २७ सिमेंट टाक्या बांधण्यात आल्या आहेत. त्यामध्ये एक फूट खोलीवर शेणखत व त्यावर दीड फूट माती टाकून पाण्याने तुडुंब भरून घेऊन कमळ रोपे लावण्यात आली. टाक्यांमध्ये गप्पी मासे सोडण्यात आले असून, माशांमुळे टाक्यांतील पाणी स्वच्छ राहण्यास मदत होणार असून, ते वारंवार बदलावे लागणार नाही.
पर्यावरण संतुलनाला चालना...
भविष्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून स्थानिक या बागेची देखभाल करणार आहेत. नक्षत्र वन, आमराई, मसाले वन, तुलसी वन, सैनिक सन्मान बाग याबरोबर आता कमळ बागेची उभारणी करण्यात आली आहे. हा उपक्रम ग्रामविकासाला चालना देणारा, पर्यावरण संतुलन राखणारा आहे. लोकसहभागामुळे समाजाची एकात्मता वाढेल, असे उपक्रम ग्रामविकासाच्या दृष्टीने गावागावात मैलाचे दगड ठरतील.
- अरुण वाघ, सरपंच