Join us

Water Management : डोंगरावरून विना लाईटचं दिड किलोमीटर शेतात पाणी कसं आलं? वाचा सविस्तर 

By गोकुळ पवार | Published: June 22, 2024 5:31 PM

Success Story : प्रेशरने हे पाणी शेती आणि पोल्ट्री साठी डोंगरावरून खाली आणण्याचा आगळावेगळा  प्रयोग केला आहे.

शेतीसाठी पाणी म्हटलं की वीज आलीच, विजेशिवाय पाणी शेतात येणं शक्यच नाही, मात्र इगतपुरी तालुक्यातील एका शेतकऱ्याने ना वीज ना कुठल्या साधनाशिवाय थेट दीड किलोमीटरवर असलेल्या शेतात पाणी आणलं आहे. डोंगराच्या पोटाशी असलेल्या झिऱ्याचे रूपांतर विहिरीत केले. आणि सर्वसाधारण विहिरीला असणाऱ्या तीन एचपी मोटरचा प्रेशर जसा असतो, तशाच प्रेशरने हे पाणी शेती आणि पोल्ट्री साठी डोंगरावरून खाली आणण्याचा आगळावेगळा  प्रयोग केला आहे. नेमक्या या पाण्याचा शोध कसा लागला? पाणी खाली कसं आणलं,  याबाबत जाणून घेऊया!

मागील वर्षी पाऊस (Rain) कमी झाल्याने ऐन उन्हाळ्यात रब्बी पिकांना पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांना फटका बसला. नाशिक जिल्ह्यातील (Nashik) बहुतांश भागात अशीच परिस्थिती अनुभवयास मिळाली. नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस पडत असलेल्या त्र्यंबकेश्वर-इगतपुरी (Trimbakeshwer) तालुक्यात देखील भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला. शिवाय रब्बीच्या अनेक पिकांचे नुकसान झाले. तसेच दरवर्षी या भागात येथील शेतकरी असो, नागरिक असो सर्वांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. मात्र तालुक्यातील शेवगेडांग येथील शेतकरी मधुकर मंगा खंडवी यांनी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या झिऱ्याला मूर्त स्वरूप देत विहीर तयार केली. आज बाराही महिने या विहिरीला पाणी असून थेट दीड किलोमीटर शेतात पाणी आणलं आहे. 

इगतपुरी- त्र्यंबकेश्वर रस्त्यावर शेवगेडांग (Shevgedang) हे गाव लागते. याच गावाला लागूनच वैतरणा धरण आहे. शेवगेडांग गावाला लागूनच असलेल्या वाडीजवळ खंडवी यांची शेती आहे. मात्र शेतीच्या वरील बाजूस साधारण दीड किलोमीटर अंतरावर आठव्याचा डोंगर उभा आहे. दाट जंगलाचा भाग असून या डोंगराच्या पोटाला लागूनच खंडवी यांची शेती सुरु होते. याच ठिकाणी खंडवी हे माध्यमिक शाळा शिकत असताना त्यांना हा झिरा दृष्टीस पडला. कालांतराने या झिऱ्याला जेसीबीच्या साहाय्याने खोदण्यात आले. आणि आश्चर्य काय झिऱ्याला चांगलं पाणी असल्याचे दिसून आले. 

 

विहिरीतून पाणी शेतात कसं नेलं... 

शेतकरी खंडवी यांनी जेसीबीने खोदल्यानंतर चांगलं पाणी लागल्याचे समोर आले. त्यामुळे शिवाय अनेक भागातून विहिरीत पाणी पाझरत असल्याचे दिसले. म्हणूनच विहीर बाराही महिने काठोकाठ भरलेली असते. ही विहीर जवळपास दीड परस खोल असून विहिरीच्या मध्यभागी एक पाईप टाकण्यात आला. हा पाईप पुढे शंभर पाऊलावर बाहेर काढत तिथे दोन स्वतंत्र कॉक काढण्यात आले. उतार असल्याने हे पाणी सलग खाली जाते. शंभर पाऊलावर असलेल्या दोन कॉक पैकी एका कॉकच्या माध्यमातून पुढे आठशे मीटरवर असलेल्या पाण्याच्या टाकीत पाणी सोडले जाते. त्यानंतर पुढे उभारलेल्या पोल्ट्री फार्मला पुरवले जाते. तर एक कॉक शेतीच्या पाण्यासाठी तयार केला आहे. 

स्वतंत्र आरओ प्लांटची उभारणी 

खंडवी यांनी पाणी थेट खाली आणल्यानंतर ते पोल्ट्री व्यवसाय देखील करत आहेत. मात्र दूषित पाण्यामुळे कोंबड्याचे मृत्यूचे प्रमाण वाढत होते. म्हणून त्यांनी स्वतंत्र आरओ प्लांट उभारणी केली. या आरओ प्लांटच्या माध्यमातून कोंबड्याना शुद्ध  पाणी पुरवठा होऊ लागला. त्यामुळे कोंबड्याचे मृत्यूचे प्रमाणही कमी झाले. शिवाय आजारांचे प्रमाणही घेतले. पाण्याच्या टाकीतून पाणी थेट आरओ प्लांट मध्ये सोडले जाते. या ठिकाणी पाण्याचे निर्जंतुकीकरण होऊन ते पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्याना दिले जाते. 

इथे पहा संपूर्ण video : 

टॅग्स :शेतीनाशिकइगतपुरीशेती क्षेत्र