Success Story : गडचिरोली जिल्ह्यातील (Gadchiroli) येथील राजेश वैजनाथ गायकवाड या पदवी झालेल्या तरुण शेतकऱ्याने तीन एकरात अद्रकाची लागवड (Ginger Cultivation) केली. या शेतीने राजेश यांना मालामाल करून सोडले. तीन एकरात सुमारे २४ लाख रुपयांचे उत्पादन घेतले. खर्च वगळता १८ लाख रुपये शुद्ध नफा झाला. गडचिरोली जिल्ह्यात अद्रकाची शेती फायद्याची ठरू शकते हे यावरून दिसून आले आहे.
राजेश गायकवाड यांच्याकडे २० एकर शेती आहे. केवळ धान शेतीवर (Paddy Farming) अवलंबून न राहता ते वेगवेगळ्या पिकांची लागवड करण्याचे प्रयोग करत असतात. यू ट्यूबच्या (Youtube) माध्यमातून त्यांनी अद्रक पीक लागवडीची माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी मराठवाड्यातील जालना येथील एका शेतकऱ्याच्या अद्रकाच्या शेतीला प्रत्यक्ष भेट दिली. त्यांच्याकडून अद्रक शेतीचे तंत्र जाणून घेतले.
या भेटीनंतर त्यांचा अद्रक शेतीबाबत आत्मविश्वास वाढला. त्यांनी तीन एकरात अद्रक लागवड केली. पहिल्याच वर्षी या शेतीतून एकरी आठ लाख रुपये प्रमाणे तीन एकरामध्ये २४ लाख रुपयांचे उत्पादन मिळाले. वाफे तयार करणे, मजुरी, खते व कीटकनाशकांसाठी सहा लाख रुपये खर्च आला. खर्च वगळता त्यांनी शुद्ध १८ लाख रूपये नफा कमावला.
८० क्विंटल उत्पादन
आता दरवर्षीच अद्रकाची शेती करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. अद्रकाची लागवड मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात केली जाते. स्प्रिंकलरद्वारे पाणी दिले जाते. मिश्र व वॉटर सोलोबल खते देण्यात येते. हे पीक ९ ते १० महिन्यांचे झाल्यानंतर त्याची काढणी करता येते. बाजारच्या कमी अधिक दरानुसार आपण याची काढणी करू शकतो. यावर्षी बाजारामध्ये ठोक विक्रेत्याकडे प्रति क्विंटल ११ हजार रूपये दर मिळाला. एका एकरामध्ये जवळपास ८० क्विंटल उत्पादन झाले. पेरणी करताना ५० ग्रामपर्यंतचे अद्रक दहा महिन्यात एक ते सव्वा किलो वजनाचे होते.
चार एकरांत केळी व पपईचीसुद्धा लागवडयापूर्वी त्यांनी चार एकरात केळीचे उत्पादन घेतले होते. यातून त्यांना एकरी तीन लाख रुपयांचे उत्पादन मिळाले. त्यानंतर दुसऱ्या चार एकरामध्ये पपईचे पीक घेतले. तिथेसुद्धा एकरी सहा लाख रुपयांचे उत्पादन झाले. ते केवळ एकाच पिकांचे उत्पादन न घेता वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन घेतात. त्यामुळे त्यांची ओळख प्रयोगशील शेतकरी अशी झाली आहे.
मराठवाड्यात अद्रकाची शेती केली जाते. आपल्याकडे अद्रकाचे उत्पादन होईल का, अशी शंका होती. मात्र मला मिळालेल्या नफ्यावरून ही शेती आपल्याकडे शक्य आहे. शेतकऱ्यांनी केवळ धानाच्या शेतीवर अवलंबून न राहता इतरही पिकांची लागवड करावी.- राजेश गायकवाड, शेतकरी