Join us

Goat Farming : 40 शेळ्या अन् दहा बोकडांची मालकीण, शेळीपालनातून गडचिरोलीच्या ताई बनल्या लखपती!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 1:35 PM

Goat Farming : जोशीला गुरुदास बोधलकर यांनी १० हजार रुपये बँकेचे कर्ज व समुदाय गुंतवणूक म्हणून १० हजार रकमेतून शेळीपालन व्यवसाय सुरू केला.

- पांडुरंग कांबळे 

Gadchiroli : व्यवसाय करण्यासाठी व त्यात यशस्वी होण्यासाठी नाही तर जिद्द आणि कठोर मेहनत आवश्यक आहे. या दोन गोष्टी असल्यास यश हमखास मिळते. ही बाब गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील घोट परिसरातील मकेपल्ली माल येथील जोशीला गुरुदास बोधलकर या महिला पशुपालकाने सिद्ध करून दाखवले आहे. त्यांचे हे यश इतर नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

मकेपल्ली माल या गावात उमेद (Umed) अभियानअंतर्गत ३० गट स्थापन करण्यात आले आहेत. उमेद अभियानांतर्गत महिलांना व्यवसाय स्थापन करण्याबाबत मार्गदर्शन केले जाते. शारदा समूहातील जोशीला गुरुदास बोधलकर या महिलेने १० हजार रुपये बँकेचे कर्ज व समुदाय गुंतवणूक म्हणून १० हजार रुपये कर्ज घेतले. या रकमेतून जोशीला यांनी शेळीपालन (Goat Farming) हा व्यवसाय सुरू केला. हळूहळू व्यवसायात वाढ होऊ लागली. त्यातच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून गावामध्ये पशुसखी म्हणून कुंदा खुशाल सोनटक्के यांची निवड करण्यात आली. 

त्यामुळे पशुसखी म्हणून त्या शेळ्यांचे लसीकरण, पोषण व स्वच्छता याबाबत मार्गदर्शन करत आहेत. सध्या जोशीला बोधलकर यांच्याकडे ४० शेळ्या व १० बोकडे आहेत. दरवर्षी एक ते दीड लाख रुपयांचे बकरे विकतात. घरीच भरपूर शेळ्या असल्याने त्यांना मजुरीला जाण्याची गरज उरली नाही. या कामात त्यांना ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या प्रभाग समन्वयक सविता खोब्रागडे, तालुका अभियान व्यवस्थापक तुषार करणे पशू व्यवस्थापक प्रीती वडे, कुंदा सोनटक्के यांची मदत मिळत आहे.

इतरांसाठी प्रेरणादायी

जोशीला या मोलमजुरी करून जीवन जगायच्या. मात्र, सतत मजुरी करण्यापेक्षा काही तरी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यातच त्यांना शेळीपालनाची माहिती मिळाली. गावासभोवताल असलेल्या मोकळ्या जागेत शेळ्यांना मुबलक प्रमाणात चारा आहे. त्यामुळे हा व्यवसाय कमी खर्चात अधिक उत्पन्न देऊ शकतो. ही बाब त्याच्या लक्षात आली. त्यांनी शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला. त्यांचा हा व्यवसाय इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

टॅग्स :शेळीपालनगडचिरोलीशेती क्षेत्रशेती