-दीपक गांगुर्डे
नाशिक : पिढ्यान् पिढ्या गायरानसाठी राखून ठेवलेल्या मुरमाड मृद जमिनीवर पीक घेणे अवघड मानले जाते. मात्र कळवण (Kalwan) तालुक्यातील पाळे खुर्द येथील शेतकरी दिनेश (भावडू) पाटील यांनी १ हे ४० गुंठे जमिनीवर वांगे पिकाची लागवड (Brinjal farming) केली आहे. तंत्रशुद्ध पद्धतीने केलेल्या लागवडीमुळे पहिल्याच खुड्याला शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळाले आहे.
जमिनीचा पोत पूर्णतः मृद व मुरबाड स्वरूपाचा असून, जमिनीत पाण्याचा निचरा त्वरित होऊन पिकाला सतत ओलावा राहावा, यासाठी ठिबक सिंचनाद्वारे पाणी देऊन वांगीभाजीपाला (Vangi Farm) पीक चांगल्या प्रकारे काढता येईल, या विचाराने पाटील यांनी १ हे ४० गुंठे जमिनीवर वांगे पीक घेतले. 'सुपर गौरव' या जातीच्या वांगे रोपे नर्सरीमधून २.५० रुपये दराने नऊ हजार रोपे २२ हजार ५०० किमतीने खरेदी करून इतर खर्च शेणखत, मल्चिंग पेपर, ड्रिप नळी, असे सर्व मिळून ३२ हजार रुपये खर्च केला. २४ एप्रिल २०२४ रोजी लागवड करून दीड महिन्यात पीक काढणीला आले.
दरम्यान पाटील यांना पहिलाच खुडा हा २० कॅरेट निघाला आणि एक कॅरेट २० किलो क्षमतेचे असून, एक कॅरेट ७०० रुपये किमतीचे आहे. पहिला खुडा एकूण किंमत १४ हजार रुपयांचा झाला. त्यामुळे पहिल्याच खुड्यात त्यांचा निम्मा खर्च वसूल झाला आहे. त्यांच्या या प्रयोगाबाबत अनेकांनी विचारपूस केली असून मुरबाड जमिनीवरील त्यांची शेती चर्चेत आली आहे.
भाजीपाला पिकाकडे केंद्रित
याबाबत भरत पाटील म्हणजे की, दहा वर्षांपूर्वी पाळे खुर्दचे शेतकरी ऊस, मका, कांदा (Onion) अशा प्रकारची पिके घेत होते; पण आता भाजीपाला पिकाकडे युवा शेतकरी वळल्याने आर्थिक प्रगती होताना दिसत आहे. तर शेतकरी दिनेश पाटील म्हणाले की, शेतीतील नवीन तंत्रज्ञान अवगत झाल्याने तसेच शेतमाल जागेवर खरेदी प्रक्रिया होत असल्याने पाळे खुर्दचा शेतकरी भाजीपाला पिकाकडे केंद्रित झाला आहे.