- विलास चिलबुले
गडचिरोली : उन्हाळा सुरू झाला की थंड पेयाची मागणी वाढते. बाजारात मिळणारे केमिकलयुक्त पेय अनेकजण पितात; पण हे पेय आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. हीच बाब हेरून आरमोरी येथील मीनाक्षी सीताराम गेडाम यांनी २०१७-१८ पासून सेंद्रिय शेतीतील लाल अंबाडी (भुकटी) पावडर (Lal Ambadi Pawder) तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. गत सात वर्षात त्यांच्या या व्यवसायाला वेगळी ओळख प्राप्त झालेली आहे. दूरवरून त्यांच्या अंबाडी पावडरची मागणी असते.
आरमोरी येथील मीनाक्षी गेडाम ह्या गृहिणी व त्यांचे पती सीताराम गेडाम हे शिक्षक आहेत, मीनाक्षी गेडाम यांना समाजकारण, राजकारणासह शेती कसण्याची अत्यंत आवड आहे. त्यातही सेंद्रिय शेती (Organic farming) कसण्याकडे त्यांचा कल. उन्हाळ्यात त्यांच्या घरी लाल अंबाडीच्या भुकटीचे पेय तयार केले जात होते. याच पद्धतीला त्यांनी व्यावसायिक स्वरूप देण्याचे ठरविले.
त्यानुसार त्यांनी लाल अंबाडीपासून पावडर तयार करून डब्यांमध्ये पॅकिंग करून विक्रीचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी पाच ते सहा महिलांना एक ते दोन महिन्यांचा हंगामी रोजगारही उपलब्ध केला.
पडीक जमिनीवर केली अंबाडी लागवड
मीनाक्षी गेडाम ह्या दीड एकर पडीक जमिनीवर अंबाडीची लागवड करतात. सोबतच ३ एकर शेतातील बांधावरसुद्धा तुरीऐवजी अंबाडीची लागवड करतात. इतर शेतकऱ्यांकडूनही २५ रुपये प्रतिकिलोप्रमाणे ओली अंबाडी त्या खरेदी करतात. साधारणतः नोव्हेंबर महिन्यात अंबाडीचा लाल भाग खुडून वाळविला जातो. त्यानंतर मशीनवर भुकटी तयार करतात. यासाठी त्यांनी २४ हजार रुपयांची मशीनही खरेदी केलेली आहे.
अडीच क्विंटल भुकटी
धान पिकाची काढणी झाल्यानंतर गेडाम या दरवर्षी अंबाडीपासून भुकटी तयार करतात. दरवर्षी अडीच क्विंटल भुकटी तयार करून ६०० रुपये प्रतिकिलोप्रमाणे विक्री करतात. लहान डब्यांमध्येही १८० ग्रॅमपासूनही भुकटी उपलब्ध असते. अंबाडीच्या बियांपासून तेलाची निर्मितीही मीनाक्षी गेडाम करतात.