Join us

Fish Farming : मिरचीची शेती सोडून 10 एकरांत सुरू केली मत्स्य शेती, नागपूरच्या शेतकऱ्याची यशोगाथा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 3:36 PM

Fish Farming Story : प्रभाकर मांढरे यांनी मत्स्य बीजोत्पादन सुरू केल्यानंतर टाटा ट्रस्ट हे त्यांचे पहिले ग्राहक ठरले.

-निशांत वानखेडे

नागपूर : शेती हा फायद्याचा विषय नाही, असे म्हटले जाते. पण त्यात अभ्यासपूर्ण प्रयोग केले तर परिवर्तन घडू शकते. नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील कुही तालुक्यातील प्रभाकर मांढरे यांनी असाच प्रयोग केला. पारंपरिक मिरचीची शेती सोडून मत्स्य शेतीची नवी वाट धरली. पूर्ण दहा एकरात तलाव बांधून मत्स्य उत्पादन (Fish Farming) सुरू केले. हा प्रयोग लाभदायकच ठरला नाही, तर महाराष्ट्र शासनाचा सन्मान देणाराही ठरला.

कुही तालुक्यातील विरखंडी येथे मांढरे यांची १० एकर शेती आहे. पूर्ण भात आणि मिरची (chilly farming) हे त्यांचे प्रमुख पीक होते. २०१५ साली भारत सरकारने मत्स्योत्पादनाला चालना देण्यासाठी 'निलक्रांती योजना' सुरू केली. या योजनेचे महत्त्व ओळखून मांढरे यांनी आधी दोन शेतात दोन शेततलाव बांधले आणि त्यात सायट्रेनस अर्थात सिपनस माशांचे बीज टाकले. सहा-सात महिन्यांतच त्या माशांची वाढ झाली आणि ते त्यांना लाभदायक ठरले. मजुरी कमी, खर्च कमी आणि फायदा अधिक मिळाला.

हा अनुभव पाहत मांढरे दांपत्याने मग चार, सहा, आठ तलाव बांधले. २०१८ मध्ये त्यांनी पारंपरिक शेतीच सोडून दिली आणि १० एकरांच्या शेतात ४० लहान-मोठे तलाव तयार केले आणि मत्स्य उत्पादनात त्यांचे मोठे प्रस्थ निर्माण झाले. पुढे त्यांनी सिपनससोबत कोलकाता येथून रोहू, कतला, मृगळ, ग्रासकार्प हे बीज आणून उत्पादन सुरू केले. विशेष म्हणजे, सुदृढ व सर्वोत्तम मत्स्यबीज म्हणून महाराष्ट्र सरकारने फेब्रुवारी २०२४ मध्ये त्यांच्या केंद्राला प्रमाणीकरण प्रमाणपत्र बहाल केले. त्यांचे केंद्र नागपूर विभागातील प्रमाणीकरण झालेले एकमेव केंद्र आहे.

मत्स्य बीजांचा प्रयोग आणि सरकारचा सन्मान

दरम्यान, मत्स्योत्पादन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना कोलकाताहून मत्स्यबीज आणण्यापेक्षा सरकारच्या मदतीने स्वतःच बीजोत्पादन करण्यासाठी मार्गदर्शन केले. २०१८ साली त्यांनी विरखंडी येथे विभागाच्या मदतीने हॅचरी तयार केली. हा प्रयोगही अत्याधिक यशस्वी ठरला. यामुळे त्यांनी मत्स्योत्पादन बंद करून मत्स्य बीजोत्पादनवरच लक्ष्य केंद्रीत केले. आज त्यांच्या केंद्रातून विदर्भासह मध्य प्रदेश, मराठवाड्यापर्यंत मत्स्यबीज पुरवठा केला जातो. या मत्स्यशेतीतून वर्षाला २५ लाखांपर्यंत उत्पन्न होत असल्याचे मांढरे यांनी सांगितले. 

पहिले ग्राहक टाटा ट्रस्ट

प्रभाकर मांढरे यांनी मत्स्य बीजोत्पादन सुरू केल्यानंतर टाटा ट्रस्ट हे त्यांचे पहिले ग्राहक ठरले. ट्रस्टने त्यावेळी यवतमाळच्या आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांसाठी मत्स्यशेतीचा प्रयोग सुरू केला होता व मांढरे यांच्या केंद्रातून बीज घेतले होते. यात तेथील महिलांना मोठा लाभ झाला. तेव्हा त्यांच्याकडून मिळालेला सन्मान मोठे समाधन देऊन गेल्याची भावना मांढरे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :शेतीनागपूरमच्छीमारशेती क्षेत्र