गाेपाल लाजूरकर
गडचिराेली : शेती हा अनिश्चिततेचा व्यवसाय म्हणून याकडे पाहिले जाते. मात्र अलीकडच्या काळात मेहनत आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर अनेक शेतकरी यशस्वीरीत्या शेती करत आहेत. विशेष म्हणजे अनेक तरुण देखील शेतीकडे वळू लागले आहेत. आणि उत्तमरीत्या शेती करत आहेत. यात उच्चशिक्षित तरुणांचा मोठा सहभाग पाहायला मिळतो आहे. अशाच एका उच्चशिक्षित दाम्पत्याने तीन एकरांत विविध प्रकारच्या भाजीपाल्याची शेती फुलवली असून संसाराला हातभार लावला आहे.
सध्या अनेक नोकरीपेक्षा शेतीला प्राधान्य देऊ लागले आहेत. अशातच उच्च शिक्षण घेतल्यानंतर नाेकरी न लागल्यास शेतीचा मार्ग अवलंबत असल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील शिवराजपूर येथील दाम्पत्याने तीन एकरांत विविध प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड केली आहे. संजू कुथे यांनी डी.एड्., तर रसिका यांनी मराठी व इतिहास या विषयांत एम. ए. केले आहे. उच्च शिक्षणाचा कुठलाही बाऊ न करता कुथे दाम्पत्य शेतात राबत आहे. भाजीपाला पिकाच्या उत्पादनातून वर्षाकाठी चांगलं आर्थिक उत्पन्न मिळत आहे. बारमाही वाहणाऱ्या नद्या व विविध पिकांसाठी सुपीक जमीन, पाेषक वातावरण म्हणून देसाईगंज तालुक्याची ओळख आहे. या तालुक्याला पाेषक वातावरणासह मार्केटसुद्धा उपलब्ध असल्याचे कुथे दाम्पत्यांना त्याचा चांगला फायदा होतो आहे.
काेणकाेणत्या पिकाची केली लागवड?
शिवराजपूर येथील शेतकरी संजू कुथे हे खरीप हंगामात दरवर्षी भाडेतत्त्वावर २० एकर शेती घेतात. यात ते धान पिकाची लागवड करतात. कुथे यांच्याकडे वडिलाेपार्जित ३ एकर शेती आहे; परंतु एवढ्या शेतीवर ते विविध पिकांची लागवड करतात. सध्या त्यांनी यंदाच्या रब्बी हंगामात चार एकर शेती उन्हाळी धान पिकासाठी भाडेतत्त्वावर घेतली आहे. पाऊण एकरात कारल्यांची लागवड बेड पद्धतीने केली आहे. पाऊण एकरांतच मिरची, तर पाव एकरात भेंडीची लागवड केली आहे. आतापर्यंत त्यांनी दीड लाखाची कारले विक्री केली आहे. याशिवाय एक लाखाहून इतर उत्पादनांची विक्री केली आहे.
संजू भाेजराज कुथे म्हणाले की, मी उच्च शिक्षण घेतले; पण शिक्षण घेतल्यानंतर श्रमाला कमी लेखले नाही. मेहनतीच्या जोरावर रब्बी हंगामात तीन एकरांत कारले, भेंडी, मिरची, आदी पिकांची लागवड केली. या पिकांचे उत्पादन निघत असून लगतच्या मार्केटमध्ये व्यापाऱ्यांमार्फत पाेहाेचविला जाताे. धानापेक्षा भाजीपाल्याची शेती फायदेशीर असल्याने मीही शेती पत्नीला साेबत घेऊन कसत आहे. याच शेतीने मला थाेडीफार आर्थिक समृद्धी दिल्याचे ते म्हणाले.