- महेंद्र रामटेके
गडचिरोली : आईवडिलांसाेबत शेतात राबून भाजीपाला व दूध विक्री करीत उच्च शिक्षण घेतले. कुटुंबातील एकमेव उच्चशिक्षित मुलाने मिळेल ती शासकीय नोकरी पत्करावी, ही आई-वडिलांची इच्छा होती. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी अभ्यास सुरू केला आणि थेट केंद्रीय लाेकसेवा आयाेगाच्या वनसेवा (आयएफएस) परीक्षेत देशातून सहावा, तर राज्यातून प्रथम क्रमांक पटकावीत आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केले. ही कहाणी आहे, मूळचे काेल्हापूर जिल्ह्याच्या कुरुंदवाडचे रहिवासी व सध्या आरमाेरी येथे कार्यरत परिवीक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी पवनकुमार जोंग यांची.
प्रश्न : शिक्षण घेताना काय अडचणी आल्या?
उत्तर : घरी शेतात आईवडिलांना मदत करायचाे. घरातील गायी-म्हशीचे दूध काढून विक्री करायचा. घरी पिकवलेला भाजीपाला विकून मी आठवीची पुस्तके घेतली होती. २००५ मध्ये आमच्या भागात महापूर आला. त्यावेळी ८० टक्के लोक गाव सोडून गेले. त्याच पूरपरिस्थितीत बी. एस्ससी. (ॲग्रि.) साठी चांगल्या कॉलेजमध्ये माझा नंबर लागला होता. मात्र पूरपरिस्थितीमुळे नेट कॅफे बंद असल्याचे कळले. तेव्हा मी व माझे वडील डोक्यावर कागदपत्रे घेऊन पुराच्या पाण्यातून २ कि. मी.चा प्रवास केला. अशा अनेक अडचणी आल्या आणि त्यातून मार्ग काढला.
प्रश्न : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांकडे कसे वळलात?
उत्तर : तामिळनाडू राज्यातील कोइंबतूर येथे कृषी विद्यापीठातून बीजशास्त्र व तंत्रज्ञान या विषयांत एम. एस्सी. करीत असताना तेथे यूपीएससीविषयी सखोल माहिती झाली. अभ्यासक्रम, परीक्षा व तेथील स्पर्धात्मक वातावरणामुळे आपणही केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन अधिकारी व्हावे, अशी जिद्द बाळगून मी यूपीएससीच्या परीक्षेकडे वळलाे.
प्रश्न : तयारी कुठे व कशी केली?
उत्तर : एम.एस्सी.चे पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर राहुरीला पीएच.डी.साठी प्रवेश घेतला; पण पीएच.डी. अर्धवट सोडून केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी करण्यासाठीच दिल्ली गाठली व तेथे एक वर्ष तयारी केली. पुन्हा पुणे गाठले व तेथे राहून पुन्हा एमपीएससीची परीक्षा दिली. २०१६ मध्ये पूर्व व मुख्य परीक्षा दोन्ही पास झालो. मात्र निवड झाली नाही.
प्रश्न : कितव्या प्रयत्नात यश मिळाले?
उत्तर : २०१८ मध्ये माझा विवाह झाला आणि जबाबदारीचे ओझे खांद्यावर आले. पुण्यात एका नातेवाइकांच्या प्लॉटवर राहिलो. त्यावेळी पत्नीने जॉब केला आणि मी अभ्यास केला. केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा दिली आणि ती पास झाल्याने आत्मविश्वास वाढला. त्यानंतर पुन्हा पुणे गाठले व अभ्यास केल्यानंतर २९ ऑक्टोबर २०२१ ला निकाल लागला आणि भारतीय वनसेवेतील देशातील सहावी रँक आणि राज्यात पहिला आलो. आठव्या प्रयत्नात यश मिळाले.
प्रश्न : जिल्ह्यात काम करताना काय अनुभव आला?
उत्तर : पेट्रोलिंग करताना एक दिवस वासाळा भागात जंगली हत्ती आले होते. तेव्हा कळपातील एका हत्तीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सर्व कर्मचारी पळाले. मात्र माझ्या पायातील दुखापतीमुळे मला त्यावेळी पळता आले नाही. मी तिथेच थांबलो, मात्र हुल्ला टीमच्या चार-पाच लोकांनी हल्ला करणाऱ्या हत्तीला हुसकावून लावले. तो क्षण आठवला की, आजही अंगावर काटे उभे राहतात.