Join us

Mixed Farming : पेरू, आंबा, सीताफळांसह विविध फळांची झाडे, फळबागेसह मिश्र शेतीचा प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 4:26 PM

Agriculture News ;

- हरिओमसिंह बघेलयवतमाळ  : यवतमाळ जिल्ह्यातील (Yavatmal) आर्णी तालुक्यातील जवळा येथील गणेश अमृतराव राऊत या प्रयोगशील शेतकऱ्याने फळबागेसह मिश्र शेतीचा प्रयोग (Mixed farming) यशस्वी केला आहे. एकीकडे शेती हा तोट्याचा धंदा म्हणत अनेकजण शेतीबाबत नकारात्मक आहेत. तर, दुसरीकडे गणेश राऊत सारख्या प्रयोगशील शेतकऱ्याने शेती कशी फायद्याची ठरते, याबाबत एक आदर्श उभा केला आहे. 

गणेश राऊत यांची शेती जवळा ते दारव्हा मार्गावर आहे. त्यांच्याकडे एकूण सात एकर शेती आहे. यात त्यांनी पेरूची बाग लावली आहे. शेतातूनच ते पेरूची विक्री करतात. आज त्यांच्याकडे पेरूची ३०० झाडे असून, चांगल्या दर्जाच्या पेरूचे ते उत्पन्न घेत आहेत. सीताफळाची ३०० झाडे त्यांनी लावली आहेत. यात दोन प्रकारच्या सीताफळांची झाडे त्यांनी लावली आहेत. याचे उत्पादन १५ ते २० दिवसांच्या फरकाने येते. विक्री करण्यासाठी सोईचे व्हावे, यासाठी दोन प्रकारचे सीताफळ लावले असल्याचे त्यांनी सांगितले. 

तसेच आंब्याची २५० झाडे लावली आहेत. यावर्षी आंब्याचे अपेक्षेपेक्षा कमी उत्पन्न आले. मात्र, पुढील वर्षी चांगले उत्पादन मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यासोबतच चिकूची ४० झाडे लावली आहेत. फणस, केळी, ऊस, बोर, जांभूळ, अंजिर, आवळा, लिंबू, रामफळ, पपई, आदी फळांची झाडेदेखील लावली आहेत. आता उर्वरित शेतात त्यांनी मिश्र पीक घेणेदेखील सुरू केले आहे. आंतरपीक म्हणून सोयाबीन, तूर, कापूस हे एकत्र लावून एक वेगळा प्रयोग यावर्षी त्यांनी केला आहे. यापूर्वी ते तीळ, ज्वारी, चणा, गहू याचेसुद्धा उत्पादन घेत असत. या शेतीसाठी ते गांडूळ खताची स्वतः निर्मिती करतात. सर्व पिकांतून वार्षिक सहा लाख रुपयांचा नफा ते मिळवित आहेत. 

मिश्र शेतीचे अनेक फायदे 

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये यशस्वी प्रयोग करणारे शेतकरी म्हणून त्यांची शासनाने दखल घेतली. १ जुलै रोजी कृषी दिनाच्या निमित्ताने कृषी विभागाच्यावतीने यवतमाळ येथे त्यांना प्रशस्तीपत्र देऊन न सत्कार करण्यात आला. शेतकरी गणेश राऊत म्हणतात की शेतकऱ्यांनी मिश्र शेतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. कारण यामुळे मातीची धूप तपासली जाते, पेरणीपूर्वी दोन पिकांचे बियाणे मिसळले जात नाही; त्यामुळे पिकांच्या गरजेनुसार खतांचा समावेश करता येतो, असे अनेक फायदे होत असतात. 

टॅग्स :शेतीशेती क्षेत्रआंबायवतमाळ