Mushroom Farming : एकीकडे रोजगार नाही, शिक्षण नाही, शेती करण्याची जिद्द मात्र आधार नाही, अशी परिस्थिती. मग मुलांचं शिक्षण, पोट भरण्यासाठीची धडपड यातून उभी राहिली मशरूम शेती (Mushroom Farming). हे वास्तव आहे, नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar) अक्कलकुवा तालुक्यातील देवमोगरा गावातील महिलांचे. या गावातील महिला आज स्वतःच्या पायावर उभ्या राहून ताकदीने संसाराचा गाडा हाकत आहेत. हेच गाव नाही तर जिल्ह्यातील जवळपास २३०० हुन अधिक महिलांनी मशरूम शेतीला आपलंस करत जीवन बदललं आहे.
ही यशकथा आहे, पूर्वीचे चिमलखेडी आताचे देवमोगरा गावाची. अक्कलकुवा तालुक्यातील (Akkalkuwa) चिमलखेडी गावाचं १९९१ ला पुनर्वसन झालं, साधारण ६० किलोमीटर अंतरावर या गावकऱ्यांसाठी नवे गाव वसविण्यात आले. आणि खऱ्या अर्थाने या गावकऱ्यांना काहीतरी करण्याची उर्मी मिळाली. आणि सुरु झाला मशरूम शेतीचा प्रवास.... जवळपास हजार- पंधराशे वस्तीचं गावं, मात्र गावातील जवळपास वीसहून अधिक महिला मशरूम शेतीतून नवी उभारी घेत आहेत. मागील पाच वर्षांपासून मशरुम शेती करत असून आता या महिलांना गावातच रोजगार प्राप्त झाला आहे.
१९९१ ला नर्मदा नदीवरील सरोवर धरणामुळे (Sarowar Dam) या चिमलखेडी, डनेल, मनीबेली गावाचे पुनर्वसन झाले. या गावातील प्रत्येक कुटुंबाला पाच एकर जमीन मिळाली. मात्र कुटुंब वाटली गेली, तशी जमीनही वाटली गेली. त्यामुळे प्रत्येकाच्या वाट्याला फारच थोडी जमीन आली. मग रोजगारासाठी इतरत्र जाण्याची वेळ आली. काही वर्षांनंतर मशरुम शेती या गावापर्यंत पोहचली आणि सगळंच बदललं.
नंदुरबार जिल्हा तसा आदिवासी जिल्हा मात्र याच जिल्ह्यातील तरुणांसह महिला आता मशरूम शेतीकडे वळू लागल्या आहेत. स्वतःच्या पायावर उभ्या संसार फुलवत आहेत. काहींचं शिक्षण कमी, काही उच्चशिक्षित मात्र मशरूम शेती सगळ्यांसाठीच नंदनवन फुलवत आहे. गरज आहे, ती शासनाच्या भरभक्कम आधाराची. येथील काहीतरी करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पॅक हाऊस सारख्या मोठ्या आधाराची गरज असल्याचे दिसून येते. जेणेकरून मशरुम शेती आणखी चांगल्या प्रकारे वृद्धिंगत होईल.
'आमच्या सारख्या कुटुंबाचं आजही रोजगारासाठी इतर ठिकाणी स्थलांतर होतं असत. त्यामुळे मुलांचं शिक्षण बंद होतं, आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. काही वर्षांपासून मात्र हे चित्र थोडं बदलत आहे. महिला वर्ग मशरूम शेती प्रशिक्षण घेत असून आम्हीही प्रशिक्षण घेऊन मशरूम शेती करू लागलो आहोत. त्यामुळे संसाराला चांगलाच हातभार लागला आहे. जागा कमी असल्याने जेवढा नफा आधी मिळायचा तेवढाच आजही मिळतो, आमच्या सारख्या महिलांना उभारी देण्यासाठी शासनाने चांगला निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. - लता वसावे, मशरुम शेती उत्पादक
गेल्या काही वर्षांपासून येथील महिलांना गावातच रोजगार मिळावा, या प्रयत्नात आहोत. त्यासाठी मशरूम शेतीचे प्रशिक्षण घेऊन प्रत्यक्ष शेती करण्यास उद्युक्त करत आहोत. आतापर्यंत हजारो महिलांनी मशरूम शेतीला प्राधान्य दिले आहे. यापुढेही अनेक महिला मशरूम शेती प्रशिक्षणासाठी सहभागी होत आहेत. कारण इतर महिलांना चांगला नफा या शेतीतून होत असल्याने ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात मशरूम शेतीला चांगले दिवस येऊ शकतात, मात्र सरकारची उदासीनता दिसून येत आहे, यासाठी मोठा पॅक हाउस ची आवश्यकता आहे. - राजेंद्र वसावे, मशरूम शेती मार्गदर्शक