Join us

Navratri Special Story : शेतीला, शेतकऱ्यांना, महिलांना बळ देणारी 'कृषी सहाय्यक', वाचा 'ती'चा प्रवास

By गोकुळ पवार | Published: October 11, 2024 10:29 AM

Navratri Special Story : शेतकऱ्यांना पीक वाढविण्यासाठी काय काय करावं लागतं असलं, त्या दिवशी ठरवलं शेवटपर्यंत शेतीसाठी अन् शेतकऱ्यांसाठी काम करायचं....'

'नोकरीचा पहिला दिवस, तो दिवस पाहण्यासाठी मोठे कष्ट घेऊन पोहचले होते. शासकीय नियमानुसार एक अनामत रक्कम भरणे आवश्यक असते. परिस्थिती अशी होती की, तात्काळ तेवढी रक्कम भरणे देखील मुश्किल होते, पण वडिलांनी जिवाच रान करून ती रक्कमही भरली, त्या दिवशी जाणवलं, शेतकऱ्यांना पीक वाढविण्यासाठी काय काय करावं लागतं असलं, त्या दिवशी ठरवलं शेवटपर्यंत शेतीसाठी अन् शेतकऱ्यांसाठी काम करायचं....' अन् त्या दिवसापासून येवल्याच्या कृषी कार्यालयात सोनाली संपत कदम, कृषी सहाय्यक अशी पाटी लागली. नवरात्रीनिमित्ताने शेतकऱ्यांना वेळीवेळी, बांधावर जाऊन मार्गदर्शन करणाऱ्या एका महिला कृषी सहाय्यकाशी साधलेला संवाद.

 

नाशिक जिल्ह्यातील (Nashik) येवला तालुक्यातील निळखेडे हे सोनाली संपत कदम (Sonali Sampaat Kadam) यांचे गाव. याच गावांत बालपण, शिक्षण होतं गेलं. घरची परिस्थिती हलाखीची, पाच बहिणी एक भाऊ असा लवाजमा असताना वडिलांनी काही कमी पडू दिलं नाही. घरची थोडीफार शेती असल्याने शेतकीचं शिक्षण घेण्याचा वडिलांचा आग्रह असायचा. म्हणून मी कृषी पदविकेपर्यंत शिक्षण घेतलं. 2011 साली कृषी पदविका पूर्ण करत त्याच वर्षी कृषी पदवीला प्रवेश घेत तेही शिक्षण पूर्ण केले. याच शिक्षणाच्या जोरावर पुढे सरळसेवा परीक्षांमधून कृषी सहाय्यक होण्याची संधी मिळाली. 

कृषी सहाय्यक निवड झाली, तेव्हा केवळ 19 वर्षांची होते. 2012 ला पहिलीच नियुक्ती येवला तालुक्यातील बोकटे गाव मिळून इतर चार गावांना मिळाली. जवळपास पाच वर्षांपासून रिक्त असलेली जागा सर्वात लहान कृषी सहाय्यक म्हणून मला मिळाली. आणि वडिलांच्या कष्टाचं चीज करण्याची आणि शेती, शेतकरी समजून घेण्याची संधी मिळाली. जवळपास 2018 पर्यंत बोगटे या परिसरात काम करत गेले.

यात 2014 साली मार्च महिन्यात प्रचंड गारपीट झाली होती. अशा गारपटीत शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावला होता. पहिल्यांदा शेतीचं एवढं नुकसान झाल्याचं पाहिलं. एवढी मेहनत घेऊनही नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यावर आभाळ कोसळलं. हे नुकसान भरून निघण्याची काहीच शास्वती राहिली नाही, राहत नाही. म्हणून त्या प्रसंगानंतर शेतकरी, शेतीसोबत स्वयंपूर्ण झाला पाहिजे, यासाठी काय उपाययोजना करता येतील का? यावर भर दिला. मग शेतीसोबत पूरक व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित केले. यानुसार आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांनी पूरक व्यवसाय सुरू केले आहेत.

इथं अजून एक प्रसंग सांगावासा वाटतो तो म्हणजे, '2017 साली संपूर्ण महाराष्ट्रात गुलाबी बोंडअळी प्रादुर्भाव होता. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. जवळजवळ 650 हेक्टरवरील कापूस पिकाची नासाडी झाली होती. यावेळी प्रत्यक्ष कृती कार्यक्रम आखला. प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी केली. एकात्मिक व्यवस्थापनासाठी काय उपाययोजना करता येतील यावर भर दिला. अनेक शास्त्रज्ञाच्या भेटी घेऊन कृषी सल्ले शेतकऱ्यांपर्यंत पोहचवले. विशेष म्हणजे गावोगावी, घराघरात जाऊन मानसिक आधार दिला. त्यांनतर दुसऱ्या वर्षी पुन्हा शेतकऱ्यांनी 550 हेक्टरवर कापूस लागवड नव्या जोमाने केली. ही घटना आजही अगदी ठळकपणे आठवत असल्याचे कदम यांनी सांगितले. 

रानभाजीची गोडी कशी लागली?

शेतकऱ्यांसोबत काम करत असताना अनेक गोष्टी शिकायला मिळत होत्या. 2019 ला तालुक्यातील आडगाव चोथवा येथे बदली झाली. या भागात महिलांशी संपर्क येत गेला. मग शिवार फेरी, शेतीशाळा आदी छोट्या मोठ्या कार्यक्रमात महिलांना सहभागी करून घेतले. यातूनच पुढे महिला सभा, परसबाग, शेतकरी प्रशिक्षण, शेतीशाळा आदी घेत असताना रानभाजीची ओळख झाली. मात्र पुरेशी माहिती नसल्याने रानभाज्यांचा अभ्यास केला. रानावनात जाऊन रानभाजी शोधून माहिती घेतली, काहींचा आहारात समावेशही केला. मग यावर स्वतः लिहायला सुरुवात केली. यातूनच रानभाजीचा प्रचार प्रसार होत गेला. शेतकऱ्यांना, महिलांना अंगणवाडी, शाळा आदि ठिकाणी रानभाजीचे महत्व पटवून दिले. त्यानंतर मिलेटबाबत जनजागृती केली. यातून मिलेटची लागवड वाढली, बाजरीचा पेरा वाढला. भगर, राजगिरा लागवड केली. ग्रामीण भागातील महिलांचे शेतीतील स्थान काय? 

महिला शेतकरी, मजूर शेतीचा आत्मा आहेत. महिलाशिवाय शेती होऊच शकत नाही. बीयांच्या नियोजनापासून ते विक्रीपर्यंत महिलांचे नियोजन असते. जेव्हा कांद्याचे रोप तयार करतो, बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक करतो आदींमध्ये महिलांचा सहभाग असतो. त्याचबरोबर कांद्याची शेतीशाळा, बाजरीची शेतीशाळा, मक्याची शेतीशाळा, फवारणीपासून ते काढणीपर्यंत महिला पुढेच असतात. म्हणूनच पुरुषांपेक्षा महिला उजवी शेती करू शकतात, अस कदम आवर्जून सांगतात.

महिलांसाठी पूरक व्यवसाय बेस्ट

पूरक व्यवसायाबाबत कदम यांनी सांगितले की, 'जेव्हा शेतीचं होणारं नुकसान पाहिलं, तेव्हापासून ठरवलं होतं की, शेतकऱ्याला, शेतीला पूरक व्यवसाय किती महत्वाचा आहे. त्यानुसार काम करत गेले. आज असंख्य महिला जोडल्या गेल्या आहेत. मग बचत गट, असो, शेतकरी महिला, एकल महिला असो आदी पूरक व्यवसायातून कुटुंब चालवत आहेत. आतापर्यंत महिलांचे शेतकरी गट, प्रक्रिया उद्योग उभारले आहेत. यात आटा उद्योग, पीठ गिरणी, मसाला गिरणी, चुलीवरच तुपाचा प्रक्रिया उद्योग आदी व्यवसाय उभे ठाकले असल्याचे त्या म्हणाल्या.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीमहाराष्ट्रनाशिक