प्रत्यक्षात श्रीकृष्णाने बालपणापासून पशुसंवर्धनाचा मंत्र देत दुग्ध व्यवसायातून आर्थिक स्वरूपात यशाची शिकवण दिली. त्यामुळेच गोकुळात दुधाचे महापूर वाहत असल्याचा इतिहास आजही ग्रामीण भागातील नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरतो. श्रीकृष्णाचा हाच गुरु मंत्र आचरणात आणत सुनंदा आणि सिंधू यांनी अथक परिश्रमाच्या संगमातून यशाची नर्मदा वाहती केली आहे. एकीकडे पशूची संख्या कमी होत असतानाच दुग्धजन्य पदार्थ आणि दुधाच्या अभाव असल्याचे लक्षात येते मात्र सुनंदा आणि सिंधू यांनी हीच गोष्ट लक्षात घेऊन गो संवर्धनावर भर दिला. याच मेहनतीतून आज नर्मदा दूध डेअरीतून छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड आणि धुळे जिल्ह्यामध्ये दुग्ध पदार्थांची विक्री करत भरभराट आली आहे.
गोकुळातील यशोदा असो की हिरकणी यांनी दूध व्यवसायातून आर्थिक सुबत्ता मिळते, अशी शिकवण महिलांना दिली. त्यामुळे या दोघींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत पाचोड येथील सुनंदा आणि सिंधू या घोडके परिवारातील दोन्ही जावांनी दूध व्यवसायात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. अथक परिश्रम आणि इच्छाशक्तीच्या बळावर या दोघींची यशस्वीरित्या उभी राहिलेली नर्मदायी दूध डेअरी आज परिसरातील महिलांना निश्चितपणे प्रेरणा देणारी ठरत आहे.
काहीं जणी शेतीसोबतच जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे वळल्या आहेत. त्यामुळे महिलांचा सहभाग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या व्यवसायातून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालविण्याकरिता अनेक महिला राबत आहेत. घोडके कुटुंबातील सुनंदा आणि सिंधू या दोन जावा आपल्या दुग्ध प्रक्रिया उद्योगाला एक उंची पर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहेत.. अवघ्या तीन वर्षातच त्यांनी आपल्या या उद्योगातून समृद्धीकडे वाटचाल करण्यास सुरुवात केली आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरापासून जवळपास २५ किलोमीटरवर पाचोड (एकोड) हे गाव आहे. घरी कुटुंबात १० जणांचा परिवार आहे. सुनंदा गणेश घोडके यांचे पती व मुले तसेच सिंधु संतोष घोडके यांचे पती व मुले सासू-सासरे असा त्यांचा परिवार आहे. आमच्याकडे ८ एकर शेती आहे. या शेतात गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही तुर, सोयाबीन, ज्वारी, गहू अशी पारंपरिक पीक पद्धतीने शेती करत होते. परंतु बदलत्या हवामानानुसार शेतीत असमानी संकटांचा सामना करावा लागला. शेतीत मनासारखे उत्पन्न निघत नाही. त्यातूनच मग काही तरी वेगळा विचार शांत बसू देत नव्हता.
प्रक्रिया उद्योगात एक पाऊल
दुग्ध व्यवसाय प्रक्रिया उद्योगात एक पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला. त्यासंदर्भात केव्हीके वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी, कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर -१ मधील कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे यांनी मार्गदर्शन केले. त्यामुळे आम्हाला दुग्ध प्रक्रिया व्यवसायाची माहिती मिळाली.
बासुंदी आणि खावा निर्मिती
घोडके यांच्याकडे घरी त्यावेळी १६ गाई होत्या. त्यामुळे त्यांनी ५० हजार रुपयांची गुंतवणूक करून तूप, खावा, बासुंदी, पेढे आदींची निर्मिती केली. आणि हे पदार्थ पाचोड गावासह छत्रपती संभाजी नगर, पैठण तालुक्यात चित्तेगाव, भालगाव, अडुळ येथे नागरिकांना असेच व्यवसायिकांना विक्री करून अपेक्षित उत्पन्न मिळाले.
प्रक्रिया उद्योगाचा विस्तार
प्रक्रिया उद्योगात त्यांना समाधान आणि अपेक्षित उत्पन्न मिळू लागले. त्यामुळे पुढे त्यांनी हाच व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. त्याबद्दल कोणत्या योजना आहेत, उद्योग उभारणीसाठी कोणत्या मशीन लागतात, किती भांडवल लागेल, बाजारात कोणत्या पदार्थाना मागणी आहे. या बाबींचा विचार केला. त्याची संपूर्ण माहिती घेतली.
पोकरा योजनेची साथ
भांडवलाची अडचण लक्षात घेऊन त्यांनी आसाराम शेतकरी गट स्थापन केला. यात गावातील ११ शेतकरी जोडले गेले. त्यांनी या गटाच्या माध्यमातून शासनाच्या नानासाहेब कृषी संजीवनी म्हणजेच पोकरा अंतर्गत दुग्ध प्रक्रिया उद्योग प्रकल्पासाठी प्रस्ताव सादर केला. तात्कालीन जिल्हा कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे आणि पोकराचे विशाल आगलावे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
याच योजनेतून उद्योगासाठी लागणाऱ्या मशीन, कोल्ड स्टोरेज गाडी, आणि दुग्ध प्रक्रिया उद्योगाचा प्लांट उभारण्यात आला. नर्मदाई डेअरीची निर्मिती झाली. लस्सी, दही, श्रीखंड, पनीर, तूप आदी पदार्थ नैसर्गिक रित्या तयार केले जातात यात शक्यतो गाईच्या दुधाचा वापर केला जातो त्यामुळे या पदार्थांपासून शरीरास कोणताही अपाय होत नसल्याचे सुनंदाताई सांगतात. आम्ही पदार्थ निर्मिती करताना योग्य ती खबरदारी आणि शासनाने घालून दिलेले नियमांचे काटेकोर पालन करून पदार्थ निर्मिती केली जाते आणि हे पदार्थ कोर्स गाडीतून पाठवले जातात असे सिंधुताई सांगतात.
गावातच रोजगाराची निर्मिती
दररोजचे नगदी उत्पन्न देणाऱ्या या व्यवसायातून आम्हाला भक्कम आर्थिक आधार झाला असल्याचे घोडके ताई सांगतात. या उद्योगामुळे गावातील महिला तसेच तरुणांना रोजगार निर्मिती होत आहे. भविष्यात हा व्यवसाय अजून वाढवण्याचा विचार आहे. त्यामुळे मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. यातूनच गाव सक्षमीकरणाचे कार्यास हातभार लागेल.