Women Farmer Story : नाशिकच्या (Nashik) आदिवासी पट्ट्यात आजही पारंपरिक पिकांना प्राधान्य दिले जाते. यात भात शेतीसह नागली, खुरासणी, वरई आदी पिके घेतली जातात. पण आम्ही ऊसापासून द्राक्षापर्यंत, डाळिंब बागेपासून मोगरा शेतीपर्यंत (Mogra Farming) सर्वच प्रयोग करून पाहिले. शेवटी रेशीम शेतीने कुटुंबाचं अर्थकारणच बदललं. तब्बल आठ वर्षांपासून आपल्या आई वडिलांच्या मदतीने तरुण शेतकरी महिलेने आदिवासी पट्ट्यात रेशीम शेतीला नवा आयाम दिला आहे. नवरात्री निमित्ताने (Navratri Special) पूजा मिलिंद भोये या पदव्युत्तर तरुण महिला शेतकऱ्याशी साधलेला संवाद.....
नाशिक-पेठ रस्त्यावर असलेल्या करंजाळी (Karanjali) गावापासून अवघ्या सहा ते सात किलोमीटर आड बु वसलेले आहे. दीड हजार लोकवस्तीच्या पाड्यात आजही पायाभूत सुविधांचा अभाव दिसून येतो. मात्र येथील नैसर्गिक सौंदर्य येणाऱ्या जाणाऱ्यांना भुरळ घालत असते. याच गावात भोये कुटुंबीय वास्त्यव्यास आहे. तरुण महिला शेतकरी पूजा भोये यांच्या वडिलांची साडे पाच एकर आहे. वडिलांचे शिक्षणही पदवीपर्यंत झाले आहे, मात्र त्यांनी पारंपरिक शेतीलाच प्राधान्य दिले. पूजा यांना लहानपणापासून शेतीचा वारसा मिळत गेल्याने शिक्षणासोबत शेतीची छोटी मोठी कामे त्या करत असतं.
भोये यांनी भात शेतीसोबतच गहू, टमाटे, फ्लॉवर आदी पिके घेण्यास सुरवात केली. यातून थोड्या फार प्रमाणात उत्पन्न वाढत गेले. तर २००७ मध्ये त्यांनी पहिल्यांदा द्राक्ष लागवडीचा निर्णय घेतला. तेव्हा आदिवासी पट्ट्यात भात शेती सोडून काहीही पिकायचं नाही. मात्र भोये कुटूंबानी द्राक्ष लागवडीचा धाडसी निर्णय घेतला. विशेष म्हणजे द्राक्ष शेतीतून चांगलं उत्पन्नही मिळाले. यातून जमिनीची लेव्हल केली, पाईपलाईन करून घेतली. याच दरम्यान त्यांचा डाळिंब शेतीचा प्रयोग फसला. पोषक वातावरण न मिळाल्याने बाग होऊ शकली नाही.
यानंतरच्या जवळपास सहा ते सहा वर्षांच्या काळात भोये कुटुंबांनी शेतीचे अनेक प्रयोग करून पाहिले. पण हाती अपयश येत गेले. २०१६ मध्ये रेशीम शेतीचा प्रयोग करण्याचे ठरविले. त्यानुसार अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना भेट देऊन रेशीम शेती बद्दल संपूर्ण माहिती घेतली. जानेवारी २०२४ मध्ये साधारण एक एकर क्षेत्रात तुतीच्या २५०० झाडांची लागवड केली. सुरुवातीला झाड तयार करण्यावर भर दिला. त्यात सेंद्रिय शेतीला प्राधान्य म्हणून घरातील गाईचे गोमूत्र , शेण, जैविक खत, स्लरी, जीवामृत आदींची यात समावेश केला. सुरवातीला मातीचे बेड तयार केले. काडी लावली, जवळपास दीड महिने रोपे तयार होण्यासाठी लागले. जानेवारीमध्ये केलेली लागवड तर जूनमध्ये पहिली बॅच काढण्यात यश आले. खऱ्या अर्थाने रेशीम शेतीच्या नव्या प्रयोगाला सुरवात झाली.
दहा वर्षांची मोगरा शेती....
नाशिक ग्रामीण भागात आजही फुलांची शेती केली जाते. भोये कुटुंबांनी देखील मोगरा शेतीला प्राधान्य दिले. साधारण १६ गुंठे जमिनीत बंगलोर वाणाच्या सिंगल कळीच्या मोगऱ्याची ५५० झाडांची लागवड होती. यातून चांगले उत्पन्न मिळत होते. मोगरा शेतीसाठी खर्च आणि मेहनत दोन्हीही करावी लागत होती. पूजा भोये यांच्या आई सांगतात, 'सकाळी उठल्यानंतर फुल तोडायला जावं लागायचं, तोडल्यानंतर लागलीच नाशिकच्या सराफ बाजारात घेऊन जायला लागायचं. जवळपास आमच्या पाड्यापासून ते सराफ बाजार अंतर ७० किलोमीटर म्हणजेच दोन अडीच तास लागायचे. एकावेळी वाहतुकीचा खर्च २०० रुपये असायचा. मात्र मोगरा जवळपास ८०० ते ९०० रुपये किलोने विकला जायचा. पण हा भाव सिजनवर अवलंबून असायचा. एका हंगामात ६० हजार खर्च तर चार पाच लाख रुपये उत्पन्न निघाल्याचे त्या म्हणाल्या.
रेशीम शेतीचे वेगळेपण काय आहे?
पूजा भोये सांगतात की, रेशीम शेती कमी खर्चात कमी मनुष्यबळावर करता येते. हे नैसर्गिक पद्धतीने वाढणारे झाड आहे. या शेतीला खते दिली पाहिजे, फवारणी केली पाहिजे, असं काही नाही. शेतकरी भात लागवडीमधून जेवढे उत्पन्न ४ महिन्यात काढतो, या शेतीत ते उत्पन्न १ महिन्यात काढता येते. या शेतीसाठी पाण्याची सोय असेल तर वर्षातून साधारण ५ ते ६ बॅचेस आपण घेऊ शकतो. सुरवातीला रेशीम विभागातून अंडीपुंजे मागवावी लागतात. ५० किलोमध्ये साधारण ३० हजार अंडीपुंज असतात. रेशीम अळयांना लागवड केलेला तुतीचा पाला खाद्य म्हणून द्यावा लागतो. २४ दिवसांचे ही चक्र असून सुरवातीचे दहा दिवस रेशीम कीटकांचे संगोपन काळजीपूर्वक केले जाते. त्या तर अळीच्या वाढीवर भर दिला जातो. साधारण २३ दिवसानंतर आळी कोष तयार करण्यास सुरुवात करते व उत्पादन घेता येते. या सर्व प्रवासात घरच्यांची मोठ्या प्रमाणात साथ असल्याने हे सर्व शक्य झाले. म्हणूनच रेशीम शेती वेगळी आणि उजवी ठरत असल्याचे भोये यांनी सांगितले.
सातबारा पुरुषांच्या नावावर, अन्....
महिलांचे शेतीतील स्थान यावर बोलताना पूजा भोये म्हणाल्या की, एकीकडे जमिनीची सगळी कागदपत्रे पुरुषांच्या नावावर असतात. जमिनीचा सातबारा ज्यामुळे जमीन कोणाच्या नावावर आहे, हे कळतं. पण शेती जरी माणसाच्या नावावर असली तरीही ७० ते ८० टक्के काम महिला करत असतात. शेतीचं संपूर्ण नियोजन करण्याची ताकद महिलांमध्ये आहे. पिकांच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत महिला शेतात राब राब राबत असतात. माझ्यासाठी शेती हा छंद आहे, शेतीतून शिकण्यासारखे आहे, शेतीमध्ये हारता येत नसल्याचे त्या आवर्जून सांगतात.